सोयाबीन उत्पादकांवर नवं संकट, जालन्यात 2 किमीच्या रांगा, शेतकऱ्यांनी केली ही मागणी
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Soybean Rate: सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला 3800 ते 4 हजार रुपयांचा दर मिळतोय. तर नाफेड खरेदी केंद्रावर 4 हजार 992 रुपयांना सोयाबीनची खरेदी केली जातेय.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: मागील काही काळात सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी प्रमुख कॅश क्रॉप ठरत आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये खरीप हंगामात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जातेय. मात्र, मागील 3 वर्षांपासून बाजारात मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहेत. आर्थिक निकड असलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात खाजगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकले आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रात नोंदणी केली. आज नाफेडचा खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याबाबत लोकल18 ने शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
advertisement
सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला 3800 ते 4 हजार रुपयांचा दर मिळतोय. तर नाफेड खरेदी केंद्रावर 4 हजार 992 रुपयांना सोयाबीनची खरेदी केली जातेय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाफेडकडे सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी केली. मात्र सरकारच्या भोंगळ कारभारामुळे गेले महिनाभर नाफेड खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नव्हता. आता नाफेड खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध झाला असताना 6 फेब्रुवारी रोजी नाफेड खरेदी केंद्र बंद होणार आहेत. यामुळे नाफेड खरेदी केंद्रा बाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी असून नाफेड खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी होतेय.
advertisement
सरकारने मुदतवाढ द्यावी
जालना शहरातील नाफेड खरेदी केंद्रावर दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांमध्ये सोयाबीन घेऊन येत आहेत. मात्र सोयाबीन खरेदीची मुदत आज संपत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होईल, अशी अपेक्षा कमीच असल्याचं शेतकरी अण्णा बाबुराव कापसे यांनी सांगितलं. तर मी आज 36 कट्टा सोयाबीन खरेदी केंद्रावर घेऊन आलो आहे. आणखी दोन ट्रिप घेऊन यायच्या बाकी आहेत. आज खरेदीचा शेवटचा दिवस आहे. आमची सोयाबीन खरेदी होईल, असं वाटत नाही. सरकारने किमान एवढा महिना खरेदीची मुदत ठेवावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
advertisement
अन्यथा कमी दराने कराव लागेल विक्री
“मी आज 35 गोण्या सोयाबीन खरेदी केंद्रावर घेऊन आलो आहे. मात्र खरेदी केंद्रावर जवळपास 2 किमीपर्यंत रांग लागलेली आहे. त्यामुळे शासनाने मुदत वाढवली तरच आमचे सोयाबीन खरेदी होईल. किमान फेब्रुवारी महिना संपेपर्यंत मुदत ठेवावी. नाहीतर आम्हालाही बाजारामध्ये 3800 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री करावी लागेल. आजही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी तसेच ठेवले आहेत. त्यामध्ये ज्वारी पेरली आहे. ज्वारी काढल्याशिवाय शेतकऱ्यांना हे सोयाबीन काढणे शक्य नाही. फेब्रुवारी पर्यंत मुदत दिल्यास सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन नाफेड मार्फत खरेदी होईल. त्यामुळे सरकारने एवढा महिना मुदत ठेवावी,” अशी मागणी दरेगाव येथील एका शेतकऱ्याने केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 06, 2025 2:51 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन उत्पादकांवर नवं संकट, जालन्यात 2 किमीच्या रांगा, शेतकऱ्यांनी केली ही मागणी







