Soyabean Market Update : हा कोणता न्याय? सोयाबीनला हमी भावापेक्षाही मिळतोय कमी भाव, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soyabean Rate News : हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा सुरू आहे. सध्या 10 आर्द्रता असणाऱ्या सोयाबीनला 4300 ते 4400 रुपये दर दिला जात आहे, तर 15 ते 20 दरम्यान आर्द्रता असल्यास प्रतिक्विंटल केवळ 3500 ते 3600 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे.
धाराशिव : सततच्या पावसामुळे नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाच दुसरीकडे हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा सुरू आहे. सध्या 10 आर्द्रता असणाऱ्या सोयाबीनला 4300 ते 4400 रुपये दर दिला जात आहे, तर 15 ते 20 दरम्यान आर्द्रता असल्यास प्रतिक्विंटल केवळ 3500 ते 3600 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. तर याभावाच्या तुलनेत शासनाचा हमीभाव मात्र, 4272 रुपये इतका आहे. म्हणजेच शेतकऱ्यांची प्रतिक्विंटल 500 ते 600 रुपयांची खुलेआम लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमीभाव केंद्राचा काटा सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
धुळे जिल्ह्यातही मिळतोय कमी भाव
धुळे जिल्ह्यातूनही असेच प्रकार समोर येऊ लागले आहेत. आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी शेतकरी पावसामध्ये भिजलेली सोयाबीन बाजारात घेऊन येतात. मात्र, आद्रतेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत आहे. सोयाबीनची आद्रता मोजण्यासाठी मॉईश्चर मीटर वापरले जाते. परंतु त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे मनमानी पद्धतीने आद्रता नोंदवली जाते अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे धुळ्यातही 4892 रुपयांचा हमीभाव असतानाही फक्त 4 हजार रुपयांमध्ये सोयाबीन खरेदी केली जात आहे. म्हणजे एकूण 900 रुपयांचा तोटा होत आहे.
advertisement
शेतकऱ्यांची अपेक्षा काय?
शासनाकडून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार होते. पुढे जाऊन त्याला 10 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे काही व्यापारी शेतकऱ्यांना लुबाडत असल्याची तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शासकीय हमीभाव केंद्र सुरू व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील ४० मंडळामध्ये रविवारी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व पिके काढणीला आले होते. तर दुसरीकडे खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतामध्ये सोयाबीनच्या मळणीसाठी ढिगारे लावण्यात आले आहेत. परंतु पावसाने त्यांचे नुकसान झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2024 11:16 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Market Update : हा कोणता न्याय? सोयाबीनला हमी भावापेक्षाही मिळतोय कमी भाव, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त