मुंबई : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दरांमध्ये ठिकठिकाणी चढ-उतार नोंदवले गेले आहेत. काही बाजारांमध्ये चांगला भाव मिळत असताना काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी दराने व्यवहार झाल्याचे चित्र आहे.
advertisement
आजचे बाजार भाव काय?
आज 10 डिसेंबर 2025 रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव बाजार समितीत 200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान 4100 रुपये, कमाल 4500 रुपये तर सरासरी 4400 रुपये दर नोंदवला गेला. याच दिवशी मुरुम बाजारात 241 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक असून सरासरी दर 4221 रुपये राहिला. बुलढाणा आणि आर्णी या बाजारांमध्येही सोयाबीनला समाधानकारक भाव मिळाल्याचे दिसून आले.
9 डिसेंबर रोजी विविध बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक नोंदवली गेली. कारंजा बाजारात तब्बल 8 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून येथे सरासरी दर 4260 रुपये राहिला. अमरावती बाजार समितीत 6741 क्विंटल आवकेसह सरासरी दर 4200 रुपये नोंदवण्यात आला. अकोला, यवतमाळ, हिंगोली, नागपूर आणि कोपरगाव या भागांतही सोयाबीनचे व्यवहार नियमित सुरू होते.
विशेष बाब म्हणजे काही बाजारांमध्ये उच्चांकी दर नोंदवले गेले. कोरेगाव आणि किनवट बाजारात सोयाबीनला थेट 5328 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाशीम बाजारातही कमाल दर 5700 रुपयांपर्यंत पोहोचले असून सरासरी दर 5500 रुपये राहिला. मंगळूरपीर-शेलूबाजार येथेही उच्च दरात व्यवहार झाल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, काही बाजारांमध्ये कमी दरांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. वरोरा-शेगाव येथे किमान दर तब्बल 2200 रुपयापर्यंत खाली घसरला, तर वणी, हिंगणघाट आणि आर्वी येथेही दर अपेक्षेपेक्षा कमी राहिले. दर्जा, ओलावा, वजन आणि साठवणुकीची स्थिती यावर दर अवलंबून असल्याचे व्यापऱ्यांचे म्हणणे आहे.
