अफगाणिस्तानकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम
हवामानतज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील पर्वतीय प्रदेशांमधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काही ठिकाणी हिमवृष्टीला सुरुवात झाली असून त्यामुळे उत्तरेकडील भागांत तापमान झपाट्याने खाली येत आहे. या थंड वाऱ्यांचा परिणाम पुढील काही दिवसांत देशातील इतर राज्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू
दरम्यान,देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात नैऋत्य मान्सून परतीच्या प्रवासाला लागला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि सिक्कीममध्येही मान्सून कमजोर होत असून, अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या पावसाची तीव्रता फारशी नसेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात मान्सून परतीच्या टप्प्यात असून, आगामी ४८ तासांत राज्यातून तो पूर्णपणे परतणार असल्याचे संकेत आहेत. त्यानंतर राज्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः मुंबई, कोकण आणि किनारपट्टी भागात दमट हवामानामुळे उष्मा जास्त जाणवणार आहे. हवामान विभागानुसार, ऑक्टोबरच्या उत्तरार्धात उष्णतेचा चटका वाढणार असून, काही भागांत घामाने त्रस्त करणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
तापमानवाढीचा आरोग्यावर परिणाम
मान्सूनच्या परतीनंतर दिवसाचे तापमान झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांमध्ये थकवा, निर्जलीकरण आणि त्वचेच्या त्रासांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाने या काळात पुरेसे पाणी पिण्याचा आणि सूर्यप्रकाशात दीर्घकाळ न राहण्याचा सल्ला दिला आहे.
देशभरातील स्थिती
शुक्रवारपर्यंत मान्सून गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून परतला होता. शनिवारीपर्यंत त्याचा विस्तार अलिबाग, अकोला, अहिल्यानगर (अहमदनगर), आणि वाराणसीपर्यंत झाला. पुढील दोन दिवसांत हा प्रवास देशाच्या सीमांपलीकडे जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या माहितीनुसार, पश्चिमी झंझावात सक्रिय असल्याने काही उत्तरेकडील राज्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. रविवारीपासून बुधवारीपर्यंत दक्षिण भारतात काही ठिकाणी हलका पाऊस होईल, तर पूर्वोत्तर राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
थंडीचा प्रभाव वाढणार
हिमालयीन राज्यांत सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे आता दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या मैदान प्रदेशांमध्येही तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उत्तर भारतातून येणारी थंडी महाराष्ट्रात पोहोचेल आणि रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना
राज्यात सध्या अनेक भागांत खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. अचानक वाढणारे तापमान आणि उष्ण वारे यामुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना कराव्यात. जसे की,
कापणी केलेल्या पिकांवर थेट उन्हाचा ताण पडू देऊ नये. पिके सुकवताना ती सावलीत व वाऱ्याच्या दिशेने ठेवा. फळबागांसाठी हलके पाणी देणे सुरू ठेवा, जेणेकरून झाडांवरील फळांना ताण बसणार नाही. पालेभाज्यांवर आणि भाजीपाला पिकांवर कीडनाशक फवारणी करताना सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेतच फवारणी करा. तापमानातील अचानक वाढ किंवा थंडीच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन फवारणी व पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करा. धान्य व डाळी साठवताना ओलसर जागेपासून दूर ठेवा, अन्यथा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.