संघर्षमय प्रवासाला सुरुवात
राजू भोयर यांचा संघर्षाचा प्रवास अगदी कठीण परिस्थितीतून सुरू झाला. रोजगाराच्या शोधात त्यांनी नागपूरला जाऊन उद्यान कामाची सुरुवात केली. तेथे काम करताना मिळालेला अनुभव, झाडे, रोपे आणि उद्यान सजावटीबद्दलचे ज्ञान त्यांनी काळजीपूर्वक आत्मसात केले. ‘स्वावलंबनच खरे समाधान’ या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी मूळ गावी भंडारा येथे फळझाडे आणि फुलझाडांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. २०१४ साली पालोरा परिसरातील दीड एकर शेतीवर त्यांनी स्वतःची पहिली नर्सरी उभारली.
advertisement
सात एकरांवर उभारलेली २५ लाख झाडांची नर्सरी
दहा वर्षांच्या सातत्यपूर्ण कष्टातून आज राजू भोयर यांनी नर्सरीचा विस्तार सात एकरांपर्यंत केला आहे. त्यांच्या नर्सरीत तब्बल २५ लाख फळझाडे आणि फुलझाडांची लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत त्यांच्या नर्सरीतून तयार होणारी झाडे मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पतींची विविधता ही त्यांच्या नर्सरीची खासियत बनली आहे.
इनडोअर सजावटी झाडांना मोठी मागणी
सध्याच्या घराच्या अंतर्गत सजावटीच्या ट्रेण्डमध्ये इनडोअर प्लांट्सची मागणी वाढत आहे. यासाठी त्यांच्या नर्सरीत अॅग्लेनिया, अॅन्थेरियम, मनी प्लांट, आर. के. पाम, बेंझोडीया आणि डीजी प्लांट यांसारख्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही झाडे घरातील वातावरण सुंदर करण्याबरोबरच हवा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
फळझाडांचं बक्कळ उत्पादन
नर्सरीमध्ये संकरित फळझाडांवर विशेष भर दिला जातो. संकरित आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पपई, अॅपल बोर, अनार, पेरू, सीताफळ, चेरी यांसह अनेक फळझाडांची दर्जेदार रोपे येथे तयार होतात. ही फळझाडे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
उद्यान आणि आउटडोअर वनस्पती
आउटडोअर झाडांमध्ये क्रोटॉन, विद्या, जुनीफर, ड्रेसिना, सायकस, गोल्डन सायप्रस आणि कॅक्टस या झाडांना मोठी पसंती मिळते. तसेच उद्यानांसाठी रॉयल पाम, एरिक पाम, डायमंड लॉन आणि सिलेक्शन लॉन यांची लागवड करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते.
५० प्रजातींची फुलझाडे
राजू भोयर यांच्या नर्सरीत ५० हून अधिक प्रजातींची फुलझाडे आढळतात. यामध्ये २० प्रकारचे गुलाब, १५ प्रकारचे जास्वंद, तसेच जाई, जुई, चमेली, मोगरा, निशिगंधा, चाफा, लिली आणि मधुमालती यांसारख्या सुगंधी फुलझाडांचा समावेश आहे. झाडांचे संगोपन ग्रीनशेडच्या साहाय्याने उच्च दर्जाने केले जाते.
वर्षाला ५० लाखांची उलाढाल
नर्सरीतून दरवर्षी सुमारे ४८ ते ५० लाख रुपयांची उलाढाल केली जाते. यात मजुरांचे वेतन, खत, कीटकनाशके, औषधे आणि व्यवस्थापन खर्च वगळता दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचा शुद्ध नफा मिळतो. सध्या त्यांच्या नर्सरीत जवळपास पाच गावांतील २० मजुरांना स्थिर रोजगार मिळत असून हा व्यवसाय ग्रामीण भागातील आर्थिक बळकटीसाठी महत्त्वाचा ठरत आहे.
