मुंबई : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, 22 आणि 23 डिसेंबर 2025 रोजी बाजारभावात संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्यामुळे दरांवर दबाव दिसून आला, तर दर्जेदार पिवळ्या आणि हायब्रीड सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी मालाची प्रत, ओलावा आणि साठवणूक क्षमतेनुसार विक्रीची रणनीती ठरवणे गरजेचे असल्याचे बाजारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
आजचे बाजार भाव काय?
23 डिसेंबर रोजी जळगाव बाजार समितीत लोकल सोयाबीनची 183 क्विंटल आवक झाली. येथे किमान 3,800 रुपये तर कमाल आणि सरासरी दर 4,400 रुपये प्रतिक्विंटल नोंदवले गेले. नागपूर बाजारातही मोठी आवक दिसून आली. येथे 886 क्विंटल आवकेसह किमान 3,800 ते कमाल 4,660 रुपये दर मिळाला, तर सरासरी दर 4,445 रुपये राहिला. भोकरदन–पिपळगाव रेणू येथे पिवळ्या सोयाबीनला 4,300 ते 4,400 रुपये दर मिळून सरासरी 4,350 रुपये नोंदवले गेले.
तर दुसरीकडे 22 डिसेंबर रोजी येवला बाजारात सोयाबीनचा दर स्थिर राहिला असून सरासरी 4,500 रुपये मिळाले. लासलगाव–विंचूर येथे मोठी 385 क्विंटल आवक असूनही कमाल दर 4,757 रुपये आणि सरासरी 4,611 रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जळगाव–मसावत आणि कोरेगाव या बाजारांत 5,328 रुपये असा उच्चांकी सरासरी दर नोंदवला गेला, जो राज्यातील उल्लेखनीय दर मानला जात आहे.
मराठवाड्यात बार्शी, माजलगाव, लातूर, जालना आणि बीड या बाजारांत मोठ्या प्रमाणात आवक झाली. बार्शी बाजारात 1,566 क्विंटल आवकेसह सरासरी 4,400 रुपये दर मिळाला. माजलगाव येथे 2,071 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,500 रुपये राहिला. लातूर बाजारात तब्बल 8,108 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून कमाल दर 4,913 रुपये आणि सरासरी 4,800 रुपये मिळाले. जालना येथे 6,276 क्विंटल आवकेसह कमाल 5,100 रुपये दर मिळाल्याने बाजारात काही प्रमाणात तेजी दिसली.
विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, खामगाव, वाशीम आणि मंगरुळपीर या बाजारांतही आवक मोठी होती. अमरावती येथे 5,958 क्विंटल आवकेसह सरासरी 4,175 रुपये दर मिळाला. अकोला बाजारात 4,082 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,575 रुपये राहिला. खामगाव येथे 10,113 क्विंटल इतकी मोठी आवक असूनही सरासरी दर 4,475 रुपये नोंदवला गेला. विशेष म्हणजे वाशीम बाजारात पिवळ्या सोयाबीनला 5,800 रुपये असा उच्चांकी कमाल दर मिळून सरासरी 5,500 रुपये नोंदवले गेले. मंगरुळपीर येथेही सरासरी 5,328 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले.
