मुंबई : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून बाजारभावात मिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काही बाजारांत दर्जेदार सोयाबीनला चांगला दर मिळत असला तरी सर्वसाधारणपणे दर स्थिरावल्याचे चित्र आहे. 23 आणि 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या व्यवहारांनुसार सोयाबीनचे दर किमान 2,500 रुपयांपासून ते कमाल 6,000 रुपयांपर्यंत नोंदवले गेले आहेत.
advertisement
सध्याचे बाजारभाव काय?
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक झाली. अमरावती बाजार समितीत लोकल सोयाबीनची तब्बल 5,790 क्विंटल आवक झाली असून येथे किमान 4,250 तर कमाल 4,500 रुपये दर मिळाला. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची 8,180 क्विंटल इतकी मोठी आवक नोंदवली गेली असून येथे सरासरी दर 4,900 रुपये इतका राहिला. जालना बाजारातही 6,130 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 5,000 रुपये नोंदवला गेला.
वाशीम बाजारपेठेत सर्वाधिक बाजार
विदर्भातील खामगाव बाजार समितीत सर्वाधिक म्हणजेच 10,310 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान 3,900 ते कमाल 5,300 रुपये दर मिळाला असून सरासरी दर 4,600 रुपये इतका राहिला. वाशीम बाजारात मात्र चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला मोठी मागणी दिसून आली. येथे कमाल 6,000 रुपये तर सरासरी 5,800 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात परळी-वैजनाथ बाजारात 1,304 क्विंटल आवक झाली असून येथे सोयाबीनला 4,550 ते 4,741 रुपये दर मिळाला. माजलगाव, नांदेड, औसा, कळंब (धाराशिव) आणि अहमपूर या बाजारांतही मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले. औसा बाजारात सरासरी 4,627 रुपये तर कळंब बाजारात 4,651 रुपये सरासरी दर नोंदवण्यात आला.
उत्तर महाराष्ट्रात लासलगाव-विंचूर, सिन्नर, पिंपळगाव (ब) आणि मनमाड या बाजारांमध्येही व्यवहार झाले. लासलगाव-विंचूर येथे 537 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,711 रुपये राहिला. पिंपळगाव (ब) – पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनला कमाल 4,780 रुपये तर सरासरी 4,730 रुपये दर मिळाला.
