राज्यातील पावसाची स्थिती
हवामान पोषक असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने तडाखा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे सर्वाधिक ११० मिमी पावसाची नोंद झाली. वणी, निफाड, पिंपळगाव बसवंत तसेच डहाणू येथे ७० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. राज्यातील सर्वाधिक तापमान ३४.८ अंश सेल्सिअस डहाणू येथे नोंदले गेले.
advertisement
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
आज (२७ ऑक्टोबर) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठीही हवामान खात्याने दक्षतेचा इशारा दिला आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव वाढणार
आग्नेय अंदमान समुद्रावर वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) निर्माण झाली असून, ती आता तीव्र होत बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. आज (२७ ऑक्टोबर) सकाळपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (२८ ऑक्टोबर) रात्री हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकिनाडा किनाऱ्याला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
सध्याच्या बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पुढील काळजी घेणे गरजेचे आहे.
काढणी लवकर पूर्ण करा: पिके पूर्ण परिपक्व झाल्यास तातडीने काढणी करावी, कारण पुढील काही दिवस वादळी पावसाचा धोका कायम राहील.
ओलसर पिकांचे ढिगारे करू नका: ओलसर धान्य एकत्र साठवल्यास बुरशी वाढू शकते. काढणी झाल्यानंतर पिके त्वरित उन्हात वाळवावीत.
शेतीत निचऱ्याची व्यवस्था ठेवा: पावसाचे पाणी शेतात साचू नये, यासाठी योग्य निचऱ्याची सोय करावी.
धान्य साठवणीपूर्वी तपासा: धान्य पूर्ण कोरडे झाल्यानंतरच गोदामात साठवा.
