दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील आठवड्यापर्यंतच्या प्राथमिक अहवालात १५३१ गावांतील तब्बल २ लाख ८६ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये नुकसानाची नोंद झाली असून, विशेषतः कांदा, द्राक्ष, फुलशेती आणि भातशेती या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
कृषी विभागाच्या अहवालानुसार, अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिके पूर्णपणे वाहून गेली, तर काही ठिकाणी पाणथळामुळे उभी पिके कुजली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. शेतकरी संघटनांनी दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईचा निधी तातडीने वितरित करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी काहीसा दिलासा मिळेल.
इगतपुरी, त्र्यंबक तालुक्यात सर्वाधिक हानी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि येवला तालुके अतिवृष्टीमुळे सर्वाधिक बाधित झाले आहेत. या भागांत ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे सर्वात उशिरा पूर्ण झाले आहेत. तसेच मालेगाव आणि नांदगाव तालुक्यांमध्ये कापूस पिकाचे ९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे पिकेच नव्हे तर शेतीच्या कुंपणासह पाण्याची वाहतूक व्यवस्था देखील उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी शेतांमध्ये अजूनही ओलसरपणा असल्याने पुढील पिकांच्या लागवडीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कांदा उत्पादकांनाही मोठा फटका
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. चाळीत साठवून ठेवलेला कांदा ओला होऊन खराब झाला, तर नव्याने लागवड केलेले कांदे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण पिके उपटून टाकावी लागली. पंचनाम्यात कांदा पिकाचे नुकसान तिसऱ्या क्रमांकावर नोंदवले गेले आहे, तर मका आणि सोयाबीन पिकांची सर्वाधिक हानी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण २५३ तालुक्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात अद्याप ही मदत प्रत्यक्षात मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी दिवाळीपूर्वी भरपाईचा निधी तातडीने मंजूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.