हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी जिल्ह्यांवर या वादळाचा सर्वाधिक परिणाम होईल. ३ ऑक्टोबरपासून हवामानात अचानक बदल होऊन पावसाचा जोर वाढेल, तर ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान काही भागांत अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
‘शक्ती’ चक्रीवादळाची दिशा आणि तीव्रता
“ट्रॉपिकल सायक्लोन अॅडव्हायजरी क्र. ०३” नुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्राच्या मध्यभागात सक्रिय होत असून उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढील काही तासांत हे वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, महाराष्ट्र किनारपट्टीला त्याचा थेट परिणाम भोगावा लागू शकतो.
advertisement
सरकारकडून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय ठेवण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे
हवामान विभागाने इशारा दिला आहे की, ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान किनारपट्टी भागात ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, तर काही भागांत ६५ किमी प्रतितास वेगाने झंझावाती वारे येऊ शकतात. या काळात झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक अडचणी अशा घटना घडू शकतात.
त्याचबरोबर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतही पावसाची तीव्रता वाढेल. खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात असताना, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना इशारा
हवामान विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की ५ ऑक्टोबरपर्यंत समुद्र अतिशय खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील सखल वस्तीतील नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पूरस्थिती आणि शेतकऱ्यांवरील परिणाम
चक्रीवादळामुळे आर्द्रतेचा प्रवेश वाढून तीव्र ढगांची निर्मिती होईल, ज्यामुळे काही भागांत पूरस्थिती उद्भवू शकते. खास करून कोकणातील भातशेती, मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापूस, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. आधीच सततच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून आता ‘शक्ती’ चक्रीवादळाने ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
प्रशासनाची तयारी आणि नागरिकांसाठी सूचना
राज्य शासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, एनडीआरएफ आणि स्थानिक पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.