मुंबई : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहेत. काही निवडक बाजारांमध्ये चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला उच्चांकी दर मिळत असताना, आवक वाढलेल्या ठिकाणी मात्र दरांवर दबाव जाणवत आहे. 8 आणि 9 डिसेंबर 2025 रोजीच्या बाजारभावावर नजर टाकल्यास, एकूणच सोयाबीनचे सर्वसाधारण दर 3,700 ते 4,500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावल्याचे चित्र आहे.
advertisement
लातूरमध्ये सर्वाधिक मागणी
राज्यातील सर्वात मोठी आवक लातूर बाजार समितीत नोंदवली गेली. येथे 18 हजार 196 क्विंटल इतकी मोठी आवक झाली असून, किमान दर 4,324 रुपये तर कमाल दर 4,620 रुपये नोंदवला गेला. सर्वसाधारण दर 4,500 रुपये राहिला. यावरून लातूर बाजारात मागणी टिकून असून दर्जेदार मालाला चांगला दर मिळत असल्याचे स्पष्ट होते.
तर वाशीम बाजार समितीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे पिवळ्या सोयाबीनला 6,200 रुपयांचा कमाल दर मिळाला असून सर्वसाधारण दर 5,650 रुपये राहिला. कमी आवक आणि उत्तम दर्जामुळे येथे दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. मंगरुळपीर बाजारातही 5,475 रुपयांचा कमाल दर आणि 5,425 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाल्याने या भागात सोयाबीनला मजबूत आधार मिळाल्याचे दिसते.
अमरावती विभागात अमरावती बाजारात 7,331 क्विंटलची लक्षणीय आवक झाली. येथे दर 3,900 ते 4,400 रुपये दरम्यान राहिले असून सर्वसाधारण दर 4,150 रुपये नोंदवण्यात आला. अकोला बाजारात 3,153 क्विंटल आवक असून सर्वसाधारण दर 4,430 रुपये राहिला. खामगाव बाजारात तब्बल 8,972 क्विंटलची मोठी आवक असूनही सरासरी दर 4,400 रुपये राहिल्याने बाजार टिकून असल्याचे संकेत मिळतात.
नांदेड, हिंगोली आणि परभणी परिसरातही सोयाबीनचे दर समाधानकारक आहेत. नांदेड बाजारात 657 क्विंटल आवक असून सर्वसाधारण दर 4,310 रुपये राहिला. हिंगोली बाजारात 1,560 क्विंटल आवक झाली असून येथे 4,360 रुपये दर मिळाला. जिंतूर, परतूर आणि गंगाखेड या बाजारांमध्येही सरासरी दर 4,350 ते 4,400 रुपयांच्या आसपास आहेत.
मात्र काही बाजारांमध्ये कमी दर्जाचा माल आणि जास्त आवक असल्याने दरांवर दबाव दिसतो. छत्रपती संभाजीनगर, वणी, हिंगणघाट आणि वरोरा-शेगाव या बाजारांमध्ये किमान दर 2,000 ते 3,000 रुपयांपर्यंत घसरले आहेत. हिंगणघाट बाजारात 2,756 क्विंटल आवक असूनही सर्वसाधारण दर 3,800 रुपयेच राहिला. वरोरा-शेगाव येथे तर 3,500 रुपयांचा सरासरी दर नोंदवण्यात आला.
नागपूर, मोर्शी, काटोल, घाटंजी आणि चांदूर बाजार या विदर्भातील काही बाजारांमध्ये दर मध्यम पातळीवर आहेत. येथे 3,900 ते 4,100 रुपयांच्या दरम्यान व्यवहार होत असल्याचे दिसते. याउलट कोरेगाव, किनवट आणि काही मोजक्या बाजारांमध्ये आवक अत्यल्प असल्याने 5,328 रुपयांचा स्थिर उच्च दर मिळाला आहे.
