AI तंत्रज्ञानानं दिलं नवं जीवन
परतवाडा तालुक्यातील खरपी गावातील विजय बिजवे यांची आठ एकरांची संत्रा बाग आहे. मागील दहा वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र, वाढता खर्च आणि घटतं उत्पादन यामुळे शेतीतून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी निराश होऊन बाग तोडण्याचा विचार केला. पण त्यांच्या मुलानं, जो बी.एस्सी. अॅग्रिकल्चरचं शिक्षण घेत आहे, वडिलांना AI तंत्रज्ञानाचा वापर करून पाहण्याचा सल्ला दिला आणि याच सल्ल्यानं त्यांच्या शेतीचं भविष्य पालटलं.
advertisement
AI वापरानं कसा झाला बदल
बिजवे यांनी शेतीतील अचूक माहिती मिळवण्यासाठी प्रथम गुगल मॅपिंग केलं आणि पुण्यातील ‘Map My Crop’ या कंपनीच्या मदतीने त्यांच्या बागेत सेन्सर बसवले. या सेन्सरद्वारे मातीचा ओलावा, पाण्याची पातळी, तापमान आणि आवश्यक पोषकतत्त्वांची माहिती रिअल टाइममध्ये मिळू लागली. या माहितीच्या आधारे त्यांनी झाडांना फक्त आवश्यक त्या प्रमाणात पाणी आणि औषधं दिली. परिणामी अनावश्यक खर्च कमी झाला आणि उत्पादनात झपाट्याने वाढ झाली.
पूर्वी त्यांचा एकूण खर्च सुमारे ५.५ लाख रुपये होता आणि उत्पन्न केवळ ५–६ लाखांपर्यंत सीमित होतं. आता खर्च केवळ ४ लाखांवर आला असून उत्पादन २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या प्रत्येक झाडावर ८०० ते १२०० संत्री लागलेली आहेत. जे आधीच्या तुलनेत तब्बल तिप्पट अधिक आहे.
नैसर्गिक शेतीची जोड
AI सोबतच बिजवे यांनी रासायनिक फवारणी कमी करून नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी गूळ, साखर आणि दूध यांच्या मिश्रणाची फवारणी केली, ज्यामुळे मधमाशांचा वावर वाढला आणि परागसिंचन अधिक प्रभावी झालं. यामुळे फळांची गुणवत्ता आणि आकार दोन्ही सुधारले.
AI वापरणं किती सोपं?
विजय बिजवे सांगतात, “AI तंत्रज्ञान वापरणं अवघड नाही. थोडं प्रशिक्षण घेतलं, तर कोणताही शेतकरी हे तंत्रज्ञान वापरू शकतो. मोबाईल आणि इंटरनेटचं थोडं ज्ञान असलं, तरी पुरेसं आहे.” त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी प्रेरित झाले आहेत आणि AI वापरण्याची तयारी दाखवत आहेत.
एकूणच, विजय बिजवे यांच्या यशोगाथेने हे स्पष्ट केलंय की, योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केवळ फायदेशीरच नाही, तर टिकाऊ आणि समृद्ध व्यवसायही ठरू शकते.
