मुंबई : संकटांना संधीमध्ये रूपांतर करण्याची जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर शेतकऱ्यालाही उद्योजक होता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अशोक गाडे. केळी शेतीत सातत्याने होणारा तोटा, बाजारातील चढ-उतार आणि नाशवंत मालाची अडचण यांना न जुमानता त्यांनी थेट नवकल्पनेचा मार्ग निवडला.
advertisement
जळगाव जिल्हा ‘भारताची केळीची राजधानी’ म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. मात्र, उत्पादन जास्त आणि दर कमी, तसेच केळीची कमी शेल्फ लाइफ यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. अशोक गाडे यांनाही हाच अनुभव आला. केळी पिकल्यावर लगेच विक्री न झाल्यास दर कोसळतात आणि मेहनतीचा मोबदला मिळत नाही. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे त्यांनी पारंपरिक शेतीपलीकडे विचार करण्याचा निर्णय घेतला.
पत्नीची खंबीर साथ मिळाली
या निर्णायक टप्प्यावर अशोक यांना खंबीर साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी कुसुम गाडे यांची. दोघांनी मिळून केळीपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. केवळ कच्चा माल विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून जास्त नफा मिळवता येतो, ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. केळी चिप्स, जाम, कँडी, पापड, चिवडा, लाडू, शेव, गुलाब जाम अशी विविध उत्पादने त्यांनी बाजारात आणली. यामधील सर्वात मोठी ओळख ठरली ती केळी बिस्किटांची.
वकिलीचा मार्ग सोडून घेतला निर्णय
अशोक गाडे मूळचे कायद्याचे शिक्षण घेतलेले आहेत. जळगाव येथून एलएलबी पूर्ण करून त्यांनी पाच वर्षे वकिली केली. मात्र, 1990 मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. घरची 12.5 एकर जमीन, पिढ्यानपिढ्यांची केळी शेती आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळे त्यांनी वकिलीचा मार्ग सोडून शेतीकडे वळण्याचा कठोर निर्णय घेतला.
केंद्र सरकारकडून मिळवलं पेटंट
गेल्या तीन वर्षांपासून अशोक आणि कुसुम गाडे केळी बिस्किटांचे उत्पादन करत आहेत. त्यांच्या या अनोख्या उत्पादनाला एप्रिल 2025 मध्ये केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले. यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही या उत्पादनाची नक्कल करू शकत नाही. सध्या त्यांनी आणखी दोन पेटंटसाठी अर्ज केला असून त्यावर प्रक्रिया सुरू आहे.
वर्षाला 50 लाखांची कमाई
आज हे केळी बिस्किट कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये विकले जाते. घाऊक बाजारात प्रति किलो 400 ते 500 रुपये दर मिळतो, तर किरकोळ बाजारात याहून अधिक दराने विक्री होते. आठवड्याला 200 ते 350 किलो उत्पादन विक्री होत असून, यामधून चौपट नफा मिळत आहे. आज केळीपासून तयार केलेल्या बिस्किटांना पासून दरवर्षी सुमारे 50 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत, एवढेच नाही तर 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना रोजगार देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहेत.
