बीड : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक तरुण चांगले शिक्षण घेऊनही नोकरीसाठी संघर्ष करत आहेत. मात्र काही तरुण पारंपरिक विचारसरणीला बाजूला ठेवून शेतीत नव्या पद्धतीने प्रयोग करत आहेत आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत. अशाच जिद्दी आणि मेहनती तरुणांपैकी एक आहेत दीपक सोनवणे जे मागील वर्षभरापासून आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये बटाट्याची यशस्वी लागवड करून लाखोंचा नफा कमवत आहेत.
advertisement
दीपक सोनवणे यांचे शिक्षण कृषी क्षेत्रात झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले परंतु त्यांना समाधानकारक संधी मिळाली नाही. मात्र त्यांनी नकारात्मक विचार करण्याऐवजी शेतीतच काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शेती करणे अनेकदा तोट्याचे ठरते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते हे दीपक यांनी ओळखले. त्यामुळे आपल्या एका एकर शेतीत बटाट्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला दीपक यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे पाण्याचा अभाव. त्यांच्या शेतात कोणतीही सिंचन सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र शेतीत काहीतरी वेगळं करून यश मिळवायचं हा उद्देश मनात ठेवला आणि त्यांनी हार मानली नाही. घरच्यांच्या आर्थिक मदतीने त्यांनी शेतात बोरवेल घेतली आणि सुदैवाने त्यांना पाण्याचा चांगला स्रोत मिळाला.
पाण्याची समस्या सुटल्यावर त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बटाट्याची लागवड केली. ठिबक सिंचनाचा अवलंब केला आणि माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात खत आणि कीडनाशकांचा वापर केला. दीपक यांनी वेगळ्या पद्धतीने शेती केली आणि बाजारपेठेचा नीट अभ्यास करून योग्य वेळी उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. परिणामी त्यांना 40 हजार खर्च वजा जाता पहिल्याच वर्षी कमीत कमी 3 लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला.
आज अनेक तरुण शेतीकडे पाठ फिरवत आहेत आणि नोकऱ्यांच्या शोधात भटकत आहेत. मात्र दीपक सोनवणे यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर शेतीतही भरघोस नफा मिळू शकतो हे त्यांनी सिद्ध केले आहे.





