पाच एकरातून मिळवलं मोठं यश
शंकर गिते यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यातून 7250 रोपे आणली आणि पाच एकर शेतात आधुनिक पद्धतीने केळी लागवड केली. ठिबक सिंचनाचा वापर करून, शेततळ्याच्या मदतीने पाण्याची समस्या सोडवत त्यांनी बाग फुलवली. कुटुंबातील मेहनतीचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत फक्त 5 लाखांच्या गुंतवणुकीत 25 लाखांचे उत्पन्न मिळवले.
advertisement
केळीची थेट इराणच्या बाजारात विक्री
यंदा शंकर गिते यांनी तब्बल 175 टन केळी उत्पादन घेतले आहे. तब्बल 13 ट्रकच्या माध्यमातून केळी इराणच्या बाजारात पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांना कुठेही विक्रीसाठी भटकावे लागले नाही. व्यापारी थेट शेतावर येऊन माल खरेदी करून गेले आहेत.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभलं
यशस्वी शेतीसाठी मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचा वापर शेती करताना त्यांना तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळाधिकारी प्रशांत पोळ, तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेंद्र धोंडे आणि शेती क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
नोकरीपेक्षा शेती लाख पटींनी फायदेशीर
शंकर गिते यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, "आज तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आधुनिक शेतीच्या संधी शोधाव्यात. मेहनत, तंत्रज्ञान आणि योग्य नियोजन केल्यास शेती हजारो नोकऱ्यांपेक्षा अधिक उत्पन्न देऊ शकते,"
आष्टी तालुक्याची शेतीत क्रांती
आज तालुक्यातील २५ हेक्टर क्षेत्रावर केळीच्या बागा आहेत आणि अनेक तरुण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. केवळ परराज्यातच नाही, तर आता आष्टीतील शेतमाल थेट परदेशांतही निर्यात होत आहे, ही बदलाची नांदी आहे. शंकर गिते यांचा हा यशस्वी प्रवास नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज, आत्मनिर्भर आणि आधुनिक शेती करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल!
