गंगापूर तालुक्यातील पुरी गावातील झेलनबाई राजाराम मोरे यांचा मळा प्रसिद्ध आहे. या शेतात नवनाथ मोरे हे सन 2020 पासून पेरूची शेती करत आहेत. त्यांनी 20 गुंठे क्षेत्रामध्ये 350 तैवान पेरू झाडांची लागवड केलेली आहे. पेरू शेतीतून निघालेलं फळ हे व्यापाऱ्यांना न देता मोरे स्वतः पेरूची विक्री करतात. त्यामुळे पेरूची शेती त्यांना अधिक फायदेशीर ठरते. यंदा 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळालेले आहे व आणखीही एक लाख रुपये म्हणजे एकूण 4 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा मोरे यांना आहे.
advertisement
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
कशी केली लागवड?
नवनाथ मोरे यांनी पेरू झाडांची 8 बाय 5 अंतरावर लागवड केलेली आहे. पाण्याची व्यवस्था ड्रीपद्वारे केली आहे. सुरुवातीचे दोन वर्ष या भागाचे फळ गृहीत धरले नाही. मात्र 2022 पासून झाडांचे फळ काढणे सुरू केले. त्यावेळी कमी उत्पादन निघाले. मात्र नंतर तिसऱ्या वर्षी सव्वादोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. हे सर्व पेरू स्वतः घरी विक्री केले, व्यापाऱ्यांना पेरू विक्री करण्यापेक्षा स्वतः त्याची मार्केटिंग करून त्या फळाला विक्री केलेले कधीही फायदेशीर ठरत असल्याचे मोरे सांगतात.
चार लाखांचे उत्पन्न
यंदा भरपूर फळ विक्री करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला अडीच ते तीन लाख रुपयांचा पेरू विकला आहे. अजून यामध्ये सव्वा एक लाख रुपयांच्या आसपास भर पडेल आणि एकूण उत्पन्न चार ते सव्वाचार लाख रुपयांपर्यंत होईल, अशी अपेक्षा शेतकरी मोरे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना सल्ला
सातत्याने पेरूच्या झाडांची निगराणी आणि सोय ठेवली तर फळे काढल्यानंतर देखील पुन्हा त्या झाडाला फळे लागतात. त्यामुळे या बागेचे व्यवस्थापन त्या पद्धतीने करणे आवश्यक आहे. खताची मात्रा, विविध औषधांच्या फवारणीसह शेणखताचा वापर करणे गरजेचे आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील पेरू शेती केली तर त्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. मात्र यामध्ये सातत्य आणि मेहनत असणे आवश्यक आहे.





