या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून ९ कोटी ७ लाख ७८ हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, त्याचे वाटप करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार, जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, खानापूर, शिराळा, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
भरपाईचे दर किती?
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी शासनाने निश्चित केलेली भरपाई खालीलप्रमाणे आहे.
advertisement
जिरायत पिकांसाठी - प्रती हेक्टर ८,५०० रुपये
बागायती पिकांसाठी - प्रती हेक्टर १७,००० रुपये
बहुवार्षिक पिकांसाठी - प्रती हेक्टर २२,५०० रुपये
यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अपुरी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे.
सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा तडाखा
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची संकटे कमी झाली नाहीत. केवळ सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यातील ३,५३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे महसूल आणि कृषी विभागाने जाहीर केले आहे. त्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील ५७६.५० हेक्टर, तासगाव तालुक्यातील ३१२ हेक्टर, आटपाडी तालुक्यातील ३२१.५० हेक्टर, जत तालुक्यातील तब्बल २,३१९ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीत जिरायत पिकांचे २,५१५ हेक्टर, बागायती पिकांचे ५३६.५० हेक्टर, तर फळबागांचे ४८३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
शेतकऱ्यांची अपेक्षा
शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत दिलासा देणारी असली तरी शेतकरी वर्गाला अजूनही मोठ्या प्रमाणात आधाराची गरज आहे. वारंवार अतिवृष्टी, पूर आणि ओलितामुळे सोयाबीन, ऊस, भात यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच फळबागाही उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे.