मुंबई : पारंपरिक शेतीतील जोखीम, खर्चात वाढ आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील भोरखेडा गावचे शेतकरी शिवाजी राजपूत यांनी बांबू शेतीच्या माध्यमातून यशाचा नवा मार्ग शोधला आहे. केळी, भाजीपाला आणि कापसासारख्या पिकांतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यानंतर त्यांनी धाडसी निर्णय घेत बांबू लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या या निर्णयामुळे 50 एकरांवर पसरलेले बांबूचे घनदाट वन उभे राहिले असून ते एकरी सुमारे साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेत आहेत.
advertisement
करारावर जमीन घेतली
शिवाजी राजपूत यांच्याकडे स्वतःची 14 एकर शेती आहे. यासोबतच त्यांनी 25 वर्षांच्या दीर्घकालीन करारावर अतिरिक्त जमीन घेतली असून एकूण 50 एकर क्षेत्रात बांबूची लागवड केली आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी शास्त्रीय आणि नियोजनबद्ध शेतीवर भर दिला. देशातील विविध राज्यांतून त्यांनी बांबूच्या तब्बल 19 जातींची निवड केली. बाजारपेठेची मागणी, हवामान आणि जमिनीची गुणवत्ता याचा अभ्यास करूनच या जाती निवडण्यात आल्या. विशेष म्हणजे, त्यांनी तयार रोपे विकत न घेता स्वतःच बियाण्यांपासून नर्सरी उभी केली. वर्षभर मेहनत घेऊन मजबूत आणि दर्जेदार रोपे तयार केली गेली.
बांबू शेती कशी ठरते फायदेशीर?
सध्या त्यांच्या शेतात 4 ते 5 वर्षे वयाचा बांबू तयार झाला आहे. बांबू लागवडीनंतर पहिल्या दोन वर्षांत थोडी अधिक काळजी घ्यावी लागते, मात्र त्यानंतर मशागतीचा खर्च आणि कष्ट मोठ्या प्रमाणात कमी होतात. राजपूत यांनी एका एकरात सुमारे 340 बांबूची बेटे लावली असून प्रत्येक बेटातून सरासरी 30 ते 40 बांबू तयार होतात. दर पंधरा दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था असून आठ बोअरवेलच्या माध्यमातून संपूर्ण 50 एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्यात आले आहे. दुष्काळ, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचा तुलनेने कमी परिणाम होतो, ही बांबू पिकाची मोठी जमेची बाजू असल्याचे ते सांगतात.
40 ते 50 रु किलो दर
फक्त बांबू विक्रीवर अवलंबून न राहता शिवाजी राजपूत यांनी मूल्यवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बांबूच्या पानांपासून ते ‘लीफ मोल्ड’ नावाचे सेंद्रिय खत तयार करतात, ज्याची बाजारात 40 ते 50 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. दरवर्षी सुमारे 20 ते 25 टन खताची निर्मिती केली जाते. याशिवाय, बांबूच्या टाकाऊ भागापासून औद्योगिक बॉयलरसाठी वापरले जाणारे ‘बायोमास पॅलेट्स’ तयार करण्यात येतात, ज्यामुळे इंधनाच्या क्षेत्रातही चांगली मागणी निर्माण झाली आहे. तसेच ते एकरी 3.5 लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत.
तसेच, कार्बोनायझेशन पद्धतीने तयार होणारा कोळसा हा शेतीतील जमीन सुपीक करण्यासाठी, पाणी शुद्धीकरणासाठी तसेच औषधी व सौंदर्यप्रसाधन उद्योगात वापरला जातो. या सर्व उपपदार्थांमुळे त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून बांबू शेती ही केवळ पर्यायी नाही, तर दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्न देणारी शेती ठरत असल्याचे राजपूत ठामपणे सांगतात. आज अनेक शेतकरी त्यांच्या या प्रयोगाकडे आदर्श म्हणून पाहत असून बांबू शेतीकडे वळण्याची प्रेरणा घेत आहेत.
