संघर्षमय सुरुवात
लोहित रेड्डी हे बेंगळुरूच्या कोम्मासंद्रा गावातील रहिवाशी आहेत. त्यांची परिस्थिती सामान्य होती. पारंपारिक शेतकरी कुटुंबातून आलेले लोहित शेतीतील कष्ट, शिस्त आणि त्यातील अनिश्चितता चांगलीच जाणून होते.घरची चार एकर जमीन ज्यावर नाचणी आणि मसूर यांसारखी पिके घेतली जायची. पण लोहितच्या मनात मात्र रंगांच्या दुनियेचं सुवासिक बागांचं वेगळंच विश्व फुलत होतं.
advertisement
नोकरीचा त्याग केला
अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मित्रांनी तंत्रज्ञान क्षेत्रात नोकऱ्या पकडल्या. पण लोहितने मात्र मनावर विश्वास ठेवत फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या चुलतभाऊ गोपाल रेड्डी यांनी 1995 पासून फुले वाढवण्याचा व्यवसाय केला होता, त्याच्याकडूनच लोहितला या क्षेत्राची पहिली प्रेरणा मिळाली. शाळेपासूनच फुलांची काळजी घेण्यापासून ते शेतीत प्रत्यक्ष काम करण्यापर्यंतचा अनुभव त्यांच्या स्वप्नांना मुळं देत होता.
पुण्याहून रोपं आणली
2012 मध्ये त्याने 15 लाखांची गुंतवणूक करून स्वतःचं पॉलीहाऊस उभं केलं. पुण्यातून 12,000 जरबेरा रोपे आणली. दरमहा 40-50 हजार फुले बेंगळुरूच्या बाजारात विकली जाऊ लागली. पहिल्याच प्रयत्नात महिन्याला दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागले. पण लोहित इथे थांबणारे नव्हते. त्यांनी क्रायसॅन्थेममचे पीक घेत प्रयोग सुरू केले. बाजारात त्याची मागणी कमी असली. तरी लोहितला त्यात भविष्य दिसले. 4,000 चौरस मीटरमध्ये त्यांनी क्रायसॅन्थेमम लावले आणि याच निर्णयाने त्यांच्या आयुष्याला नवे वळण दिले.
वेगवेगळे प्रयोग केले
या पिकाच्या सर्वात मोठ्या अडचणी म्हणजे प्रकाशसंवेदनशीलता. त्यावर उपाय म्हणून लोहितने प्रकाशावर नियंत्रण ठेवण्यासाठी जाळ्या, आर्द्रता राखण्यासाठी विशेष पद्धती, विविध रंगांच्या जाती यावर अनेक प्रयोग केले. प्रत्येक अडचणीतून शिकत, पडलो-उभा राहिलो करत त्यांनी स्वतःची तांत्रिक पद्धत विकसित केली.
महिन्याला 7 लाखांची कमाई
अखेर शेवटी त्यांची मेहनत रंगाला आली.‘लोहित फ्लोरा’ या नावाने त्यांनी क्रायसॅन्थेममचे व्यापारी उत्पादन सुरू केले. 2023 नंतर संपूर्ण 2.5 एकर जमीन त्यांनी फक्त या फुलासाठी राखून ठेवली. आज त्यांचा व्यवसाय बेंगळुरूपलीकडे विस्तारला असून त्यातून दरमहा सुमारे 7 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
