१५ लाखांची नोकरी सोडून शेतीचा निर्णय
राहुल कुमार असं या शेतकऱ्याचे नाव असून ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील खजरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी बीटेक आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळपास १५ वर्षे एका पॉवर प्लांटमध्ये अभियंता म्हणून काम केले. वार्षिक १५ लाख रुपयांचे पॅकेज असलेली स्थिर नोकरी असतानाही, आयुष्यातील दोन मोठ्या दु:खद घटनांनी त्यांचे जीवन पालटले. वडील आणि मुलाला कर्करोगामुळे गमावल्यानंतर, त्यांनी आरोग्य आणि अन्नाच्या गुणवत्तेबद्दल गंभीरपणे विचार केला. त्यातूनच त्यांनी २०१८ मध्ये नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सेंद्रिय शेतीचा अवलंब
शेतीबाबतचे ज्ञान मिळवण्यासाठी राहुल यांनी राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतला आणि देशभरातील शास्त्रज्ञ व कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी जीवामृत, गांडूळखत, नीमस्त्र यांसारखी नैसर्गिक खते तयार करायला शिकले. तसेच इस्रायली तंत्रज्ञानाच्या आधारे संरक्षित शेती आणि मशरूम उत्पादन सुरू केले.
कोणत्या पिकांचे उत्पादन घेतात?
राहुल यांच्या १० एकर शेतीत गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, मूग आणि विविध भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यांनी पूर्णतः रसायनमुक्त सेंद्रिय शेती अवलंबली असून, यामुळे त्यांच्या उत्पादनांचा दर्जा आणि बाजारमूल्य दोन्ही वाढले आहे. याशिवाय ते दुग्धउत्पादन आणि मशरूम शेती देखील करतात.
त्यांच्या सेंद्रिय प्रक्रिया युनिटमध्ये तयार होणारे “रसायनमुक्त नवरत्न पीठ” हे उत्पादन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, काळा गहू आणि इतर धान्यांच्या मिश्रणातून तयार हे पीठ सध्या बाजारात मोठ्या मागणीवर आहे. या युनिटमुळे परिसरातील ५० हून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
उलाढाल आणि विस्तार
एकेकाळी १५ लाख पगारावर काम करणारे राहुल आता १.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल करतात. त्यांची उत्पादने गुरुग्राम, नोएडा, पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांत विक्रीसाठी पाठवली जातात. त्यांनी “श्रीराम ऑर्गॅनिक फार्मर्स ग्रुप” नावाने कंपनी स्थापन केली असून, त्यासोबत ६०० हून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. राहुल हे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात.
राष्ट्रीय स्तरावर गौरव
शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राहुल कुमार यांना ‘मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया २०२४’ हा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. याशिवाय २०२२ मध्ये त्यांना ऑर्गॅनिक इंडिया पुरस्कार (आग्रा), तर २०२३ मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्य सेंद्रिय शेती पुरस्कार मिळाला.
