इंजिनीअरिंग कडून शेतीकडे प्रवास
केल्विन आणि फरीश हे दोघे इंजिनीअर असून त्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून हायड्रोपोनिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून शेतीत क्रांती घडवली आहे. केल्विन आणि फरीश यांनी मंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग (MITE) मधून शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर केल्विनने बंगळुरूमध्ये नोकरी केली, तर फरीशने छोटा सीफूड व्यवसाय सुरू केला. या काळात फरीशला हवामान बदल आणि आर्थिक अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव झाली. दोघांनी एकत्र चर्चा करत शेती अधिक नफ्याची आणि टिकाऊ बनवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
‘Krop AI’ कंपनीची केली स्थापना
सन 2021 मध्ये केल्विनने नोकरी सोडून फरीशसोबत उडुपी येथे ‘Krop AI’ ही कंपनी स्थापन केली. त्यांनी एका छोट्या फ्लॅटमधून प्रयोग सुरू केले आणि हायड्रोपोनिक शेतीसाठी एक प्रोटोटाइप तयार केला. चार महिन्यांत त्यांनी AI-आधारित वर्टिकल फार्मिंग सिस्टम तयार केली. कर्नाटकमधील ब्रह्मवरा येथे त्यांनी उभारलेल्या वर्टिकल फार्ममध्ये लेट्यूस, तुळस, केल आणि पार्सले यांसारखी विदेशी पिके घेतली जातात. ही पिके भारतात सहसा घेतली जात नाहीत.
हायड्रोपोनिक्स आणि एआयचा संगम
पूर्वीची शेती पावसावर, मातीच्या गुणवत्तेवर आणि कीटकनाशकांवर अवलंबून होती. पण AI-आधारित हायड्रोपोनिक्समुळे पाणी आणि संसाधनांची बचत होते. या प्रणालीत पाण्याचा पुनर्वापर होत असल्याने 95% पाणी वाचते. खर्च सुमारे 50% पर्यंत कमी होतो. शेतकऱ्यांना आता वातावरण, पाऊस किंवा मातीवर अवलंबून राहावे लागत नाही कारण पिके पूर्णपणे नियंत्रित वातावरणात वाढतात.
सिंचन प्रणाली सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. ती तापमान, आर्द्रता, पाण्याचा पीएच, विद्युतवाहकता आणि हवेचे तापमान मोजते. रोपांना वाढीसाठी आवश्यक प्रकाश मिळावा म्हणून विशेष निळ्या-जांभळ्या रंगाच्या LED लाईट्सचा वापर केला जातो. केल्विन सांगतात, “हा प्रकाश सूर्याच्या प्रकाशासारखा असतो, पण फक्त 600 ते 700 नॅनोमीटरच्या तरंगलांबीतील किरण देतो, जे फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असतात.”
लाखोंची कमाई आणि शेतीत नवे युग
फरीश सांगतात की, पारंपरिक पद्धतीने १ किलो स्ट्रॉबेरी पिकवण्यासाठी सुमारे ८०० रु खर्च येतो, तर AI-आधारित हायड्रोपोनिक्समध्ये तो केवळ ३०० रु पर्यंत कमी होतो. Krop AI सध्या विविध रिटेल कंपन्या आणि कृषी उद्योजकांसाठी फार्म सेटअप तयार करते. त्यांच्या एका सेटअपची किंमत सुमारे ५ लाख रु असून त्यातून ५०० लेट्यूस रोपे सहज उगवता येतात.
५० लाखांपेक्षा जास्त उलाढाल
केल्विन आणि फरीश यांनी आतापर्यंत १० पेक्षा जास्त फार्मिंग युनिट्स उभारली आहेत. वर्ष २०२३ मध्ये त्यांनी आपल्या “फार्म स्टेशन” प्रकल्पातून तब्बल ५० लाखांची उलाढाल केली, ज्यात दरमहा सुमारे ४ लाखांपेक्षा जास्त नफा मिळाला आणि ४०% नफ्याचा दर साधला. आणि आजही ते कोट्यवधींची कमाई करत आहेत.
