मुंबई : वाढता शेतीखर्च, पाण्याची टंचाई आणि कमी होत चाललेली शेतीयोग्य जमीन यामुळे आज अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिणामी काही शेतकऱ्यांनी शेतीपासून दूर जाऊन इतर व्यवसायांचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या जोरावर शेतीतच यशस्वी ठरत आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक नाव म्हणजे आकाश चौरसिया. पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर जाऊन त्यांनी ‘बहुमजली शेती’ हे अभिनव मॉडेल विकसित केले असून, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.
advertisement
शेतीचा मार्ग कसा निवडला?
मध्य प्रदेशातील बुंदेलखंड परिसरातील सागर या छोट्याशा शहरात जन्मलेल्या आकाश चौरसियाचे वय अवघे 32 वर्षे आहे. लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा त्याच्या मनात होती. सुरुवातीला डॉक्टर बनून लोकांची सेवा करावी असे त्याचे स्वप्न होते. मात्र लोक आजारी का पडतात? याचा शोध घेताना त्याच्या लक्षात आले की अयोग्य आहार आणि रासायनिक पदार्थांनी भरलेले अन्न हे अनेक आजारांचे मूळ कारण आहे. याच विचारातून त्याने आरोग्यदायी आणि सेंद्रिय अन्न उत्पादनाचा मार्ग निवडला.
2010 मध्ये केली सुरुवात
2010 साली आकाशने अत्यंत कमी क्षेत्रात सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. त्याचे कुटुंब आधीपासून शेतीशी जोडलेले होते आणि सुपारीची लागवड केली जात होती. अनुभव आणि निरीक्षणातून शिकत असताना 2014 मध्ये त्याला एकाच जमिनीत अनेक पिके घेण्याची कल्पना सुचली. शेतकरी कुटुंबातून आलेला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी त्याला चांगल्या प्रकारे माहिती होत्या. त्यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर त्याने प्रयोग सुरू केले.
सुरुवातीला आकाशने शेतीचे दोन थर तयार केले. जमिनीवर आणि जमिनीच्या खाली पिके घेण्याचा प्रयोग केला. टोमॅटो आणि कारल्याच्या लागवडीने त्याने सुरुवात केली. मात्र लवकरच तण आणि गवताची समस्या समोर आली. या समस्येवर उपाय म्हणून त्याने पालक, मेथी, धणे यांसारखी पानांची पिके पृष्ठभागावर लावली. ही पिके जलद वाढत असल्याने तणांना वाढण्यासाठी कमी जागा मिळाली आणि सुमारे टक्के 80 तण नियंत्रणात आले.
यानंतर जागेच्या मर्यादेवर मात करण्यासाठी आकाशला शहरातील बहुमजली इमारती प्रेरणादायी ठरल्या. कमी जागेत अधिक लोक राहू शकतात, तर शेतीतही ते शक्य आहे, हा विचार त्याच्या मनात आला. त्यानुसार त्याने सुमारे 6.5 फूट उंचीवर बांबूची रचना उभारून त्यावर जाळी बसवली. त्यामुळे पिकांना आवश्यक तेवढा प्रकाश आणि सावली मिळू लागली. तिसऱ्या थरात वेलवर्गीय पिके घेतली, तर चौथ्या थरात आंबा, पपई, चिंचोळा यांसारखी फळझाडे लावली.
वर्षाला 30 लाखांची कमाई
या बहुमजली शेती पद्धतीसाठी पारंपरिक शेतीपेक्षा सुमारे 80 टक्के कमी पाणी लागते. पिकांचे अनेक थर असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो. एकाच क्षेत्रातून चार वेगवेगळी पिके घेतल्याने उत्पन्नात मोठी वाढ होते. या पद्धतीमुळे आकाश चौरसिया दरवर्षी सुमारे 30 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहे.
80 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण
स्वतःपुरते मर्यादित न राहता आकाशने ही पद्धत इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला आहे. आतापर्यंत त्याने सुमारे 80 हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले असून, 12 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना बहुमजली शेतीविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण कार्यासाठी आकाश चौरसियाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
