मुंबई : बदलत्या काळात पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण होत असताना शेतकरी आता पर्यायी आणि दीर्घकालीन नफा देणाऱ्या पिकांकडे वळताना दिसत आहेत. अशाच पिकांपैकी एक म्हणजे चंदन. सुगंधी लाकडासाठी ओळखले जाणारे चंदन आज शेतकऱ्यांसाठी ‘हरित सोनं’ ठरत आहे. एका चंदनाच्या झाडापासून सरासरी 30 ते 40 किलो लाकूड मिळते आणि त्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे चंदनाची झाडे 5 अंश सेल्सिअसपासून ते 50 अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात तग धरू शकतात. त्यामुळे गुजरातप्रमाणेच पंजाबची माती आणि हवामानही चंदन लागवडीसाठी अनुकूल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
एक हजार झाडांची लागवड
गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये चंदन लागवडीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. भरूच जिल्ह्यातील अल्वा गावचे शेतकरी अल्पेश पटेल हे त्याचे ठळक उदाहरण मानले जाते. सन 2003 मध्ये त्यांनी धाडसाने चंदन लागवडीचा निर्णय घेतला. त्या काळात शेतकऱ्यांमध्ये या पिकाबाबत भीती आणि संभ्रम होता. नवीन पीक, जास्त कालावधी आणि अनिश्चितता यामुळे अनेकांनी हात आखडता घेतला. मात्र अल्पेश पटेल यांनी पाच एकर जमिनीत सुमारे एक हजार चंदनाची रोपे लावून दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला अडचणी आल्या, पीक अपयशीही ठरले; परंतु त्यांनी हार मानली नाही. कृषी संशोधन संस्थांमध्ये मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी लागवड अधिक शास्त्रीय पद्धतीने सुरू ठेवली.
15 कोटींची कमाई
पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या संयमाचे फळ मिळाले. चंदन विक्रीतून त्यांनी सुमारे पंधरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. या यशस्वी प्रयोगाची दखल घेत गुजरात सरकारने त्यांचा सन्मानही केला. विशेष म्हणजे गुजरात सरकार केवळ चंदन लागवडीला परवानगीच देत नाही, तर विक्री आणि निर्यातीसाठीही शेतकऱ्यांना मदत करते.
या यशामुळे प्रेरित होऊन पंजाबमध्येही चंदन लागवडीला चालना मिळत आहे. पंजाब वन विभागाने घलोदी बीड येथे प्रात्यक्षिक स्वरूपात चंदनाची लागवड सुरू केली आहे. याशिवाय रोपार, लुधियाना, होशियारपूर आणि बठिंडा भागातही चंदनाची रोपे लावण्यात आली आहेत. घलोदी बीडमधील झाडे सुमारे वीस वर्षांची असून भविष्यात त्यांची विक्री करून उत्पन्न मिळवण्याचा विभागाचा मानस आहे. यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पंजाबमधील समराळाजवळील शेतकरी अरुण खुर्मी यांनी कर्नाटकातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ येथे प्रशिक्षण घेऊन चंदनाच्या रोपवाटिका सुरू केल्या आहेत. ते आता स्थानिक शेतकऱ्यांना रोपे पुरवत आहेत. चंदन लागवड ही दीर्घकालीन गुंतवणूक असली तरी कमी खर्चात मोठा परतावा देणारी शेती पद्धत मानली जाते. एका अंदाजानुसार, एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 10 ते 15 पट परतावा मिळू शकतो.
लाल चिकणमाती, खडकाळ किंवा चुनखडीयुक्त जमीन चंदनासाठी योग्य ठरते. एप्रिल-मे महिन्यात खोल नांगरणी करून लागवड केली जाते. प्रति एकर सुमारे 400 रोपे लावता येतात. रोपांची किंमत साधारण 40 ते 50 रुपये असते. चोरीचा धोका असल्याने कुंपण आणि विमा संरक्षणही आवश्यक मानले जाते. एकूणच, योग्य नियोजन, संयम आणि मार्गदर्शन घेतले तर चंदन लागवड शेतकऱ्यांचे आर्थिक भविष्य बदलू शकते.
