धाराशिव - पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत एका शेतकऱ्याने फळबागेची शेती केली. या फळबागेच्या शेतीतून आता या शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे. तसेच जैविक पद्धतीचा वापर करुन कमीत कमी खर्चात चांगले उत्पन्न कसे कमावते येते, हे या शेतकऱ्याने सिद्ध करुन दाखवले आहे. आज जाणून घेऊयात, या शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी.
धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड येथील संजय कुमार बोराडे हे अगोदर पारंपारिक शेती करायचे. यामध्ये ते सोयाबीन, उडीद, तूर, ज्वारी यासारख्या पिकांचे उत्पादन घ्यायचे. 2020 ला त्यांनी फळबाग लागवड करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या अंतर्गत 6 एकरावर फळबाग लागवड केली. सुरुवातीला 2 वर्ष सोयाबीनचे आंतरपीक घेतले. आता ते जैविक शेतीच्या माध्यमातून सिताफळच्या बागेतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
advertisement
15 लाख रुपयांचे उत्पन्न होणार -
सध्या सीताफळच्या झाडाला 20 ते 50 पर्यंतची सेटिंग आहे. तर फळबागेसाठी 60% जैविक पद्धतीचा आणि 40% रासायनिक पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे बागेसाठी होणारा खर्च हा कमी होत आहे. यावर्षीच्या उत्पादनासाठी त्यांचा आतापर्यंत केवळ साडेतीन लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर 30 टन सीताफळीचे उत्पन्न निघण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यातून किमान 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न होईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
खरंतर पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवडीतून आणि त्यातली त्यात जैविक शेतीच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आतापर्यंत त्यांनी सिताफळचे दोनदा उत्पादन घेतले. यामध्ये पहिल्यांदा त्यांना 4 लाख रुपये आणि दुसऱ्यांदा 8 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. तर यावर्षी 15 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना दिला हा मोलाचा सल्ला -
फळबाग लागवडीतून त्यांनी चांगले उत्पन्न घेतले आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवावे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.