मुंबई : बदलते हवामान, अनियमित पावसाचे चक्र आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतीसमोर अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही प्रगतिशील शेतकरी पारंपरिक ज्ञानाला आधुनिक नियोजनाची जोड देत शेतीत नवे प्रयोग करत आहेत. अशाच प्रयोगातून जावली तालुक्यातील हुमगाव येथील शेतकरी कमलाकर भोसले यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून एकरी तब्बल १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले असून, त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
पाण्याची तीव्र टंचाई
जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या पूर्वेकडील काही गावांना धोम धरणाचे पाणी उपलब्ध होते, मात्र बहुतांश भागात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासते. अशा परिस्थितीतही उपलब्ध विहिरींच्या मर्यादित पाण्यावर योग्य नियोजन, ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून चांगले उत्पादन घेता येते, हे कमलाकर भोसले यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.
१५०१२ या जातीच्या उसाची लागवड
कमलाकर भोसले यांनी गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी आपल्या शेतात १५०१२ या जातीच्या उसाची लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची सखोल नांगरणी करून रोटरच्या सहाय्याने काडीकचरा, सोयाबीनचा काड आणि गवत जमिनीत मिसळण्यात आले. त्यानंतर देशी गाईचे शेणखत मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आले. १०० लिटर पाण्यात एक लिटर देशी गाईचे गोमूत्र मिसळून तयार केलेल्या द्रावणाची फवारणी करण्यात आली. या प्रक्रियेमुळे जमिनीत गांडुळांची संख्या वाढली आणि मातीतील नत्र, स्फुरद व पालाश या पोषक घटकांची नैसर्गिकरीत्या निर्मिती झाली.
उसाची लागवड करताना आठ फुटी सऱ्या तयार करण्यात आल्या. दोन सऱ्यांच्या मधोमध टोमॅटोचे आंतरपीक घेण्यात आले, ज्यातून अतिरिक्त उत्पन्नही मिळाले. सुरुवातीच्या काळात उसाला पाटाने पाणी देण्यात आले, तर पुढील टप्प्यात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला गेला आणि पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळाले.
ऊस कांडे धरण्याच्या अवस्थेत असताना गोमूत्र-पाणी मिश्रणाच्या ठरावीक कालावधीत दोन फवारण्या करण्यात आल्या. संपूर्ण हंगामात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने उसाचे उत्पादन घेण्यात आले. या पद्धतीचा थेट परिणाम उत्पादनावर दिसून आला आणि उसाची वाढ, जाडी व वजन लक्षणीयरीत्या वाढले.
२० हजार खर्च
हुमगावच्या पश्चिमेकडे वालुथ गावाच्या रस्त्यालगत असलेल्या या शेतात कमलाकर भोसले यांनी देशी गाईच्या शेण व मूत्राचा प्रभावी वापर करून जमिनीचा पोत सुधारला आहे. योग्य नियोजन, वेळेवर मशागत आणि सेंद्रिय घटकांचा समतोल वापर केल्यास कमी खर्चातही विक्रमी उत्पादन घेता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रयोगासाठी एकरी केवळ २० हजार रुपयांपर्यंतच खर्च आला आहे.
“सेंद्रिय शेती केल्यास नक्कीच चांगले उत्पादन मिळते. देशी गाय ही सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गाईचे शेण आणि मूत्र जमिनीचा पोत सुधारतात तसेच पिकांची उत्पादनक्षमता वाढवतात. गेली पाच वर्षे मी सातत्याने प्रयोग करत असून, त्याचेच हे फलित आहे. रासायनिक खतांचा वापर न करता एकरी १२० टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्नासाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे,” असे आवाहन शेतकरी कमलाकर भोसले यांनी केले आहे.
