छत्रपती संभाजीनगर : योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारातील चढ-उतारांचा अचूक अंदाज घेतला तर कमी क्षेत्रातही शेतीतून मोठे उत्पन्न मिळू शकते, हे घाटनांद्रा येथील तरुण शेतकरी कारभारी भिका मोरे यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या 20 गुंठे क्षेत्रात केलेल्या टोमॅटो लागवडीमधून अवघ्या चार महिन्यांत खर्च वजा जाता सुमारे दोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांनी मिळवले असून परिसरातील शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.
advertisement
कारभारी मोरे हे पारंपरिक शेती करणारे शेतकरी असून त्यांनी यावर्षी प्रयोगशील दृष्टीकोन ठेवत भाजीपाला शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतजमिनीत इतर पिकांबरोबरच त्यांनी ऑगस्ट महिन्यात 20 गुंठ्यांत टोमॅटोची लागवड केली. लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाजारात टोमॅटोचे दर अत्यंत कमी होते. त्यामुळे अनेक शेतकरी पिकाकडे दुर्लक्ष करतात किंवा नुकसान सहन करून तोडणी थांबवतात. मात्र मोरे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखत पिकाची योग्य काळजी घेण्याचा निर्णय घेतला.
टोमॅटोची केली लागवड
टोमॅटोच्या पिकासाठी त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केला. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे अचूक व्यवस्थापन करण्यात आले. वेळेवर रोग व कीड नियंत्रणासाठी फवारण्या केल्या. सेंद्रिय खतांसोबत आवश्यक प्रमाणात रासायनिक खतांचा संतुलित वापर करून पिकाची वाढ जोमदार ठेवण्यात आली. तसेच टोमॅटोची झाडे मजबूत उभी राहावीत यासाठी काड्यांचा आधार देण्यात आला. मजूर खर्च, खते, औषधे, फवारणी, देखभाल आणि इतर कामांसाठी सुमारे ८० हजार रुपयांपर्यंत खर्च झाल्याची माहिती मोरे यांनी दिली.
दरम्यान, काही आठवड्यांनंतर बाजारात टोमॅटोला पुन्हा मागणी वाढू लागली. याचा थेट फायदा मोरे यांच्या पिकाला झाला. एका टप्प्यावर टोमॅटोला प्रति क्रेट तब्बल १ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. या चांगल्या भावामुळे त्यांनी अल्प कालावधीत मोठे उत्पन्न मिळवले. सध्या केंद्र सरकारकडून आयात सुरू झाल्यामुळे टोमॅटोचे दर काहीसे घसरले असून सध्या सुमारे ४०० रुपये प्रति क्रेट असा दर मिळत आहे. तरीही उत्पादन खर्च कमी, मालाची गुणवत्ता उत्तम आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच यामुळे मोरे यांची विक्री सुरळीत सुरू आहे.
सध्या त्यांच्या शेतात टोमॅटोची तोडणी जोमात सुरू असून पुढील एक ते दीड महिना उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. जळगाव, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर, पाचोरा आदी शहरांमध्ये ते आपला माल विक्रीस पाठवत आहेत. बाजारातील चढ-उतार असूनही सातत्याने नियोजन केल्यास शेतीत नफा मिळू शकतो, असा विश्वास कारभारी मोरे यांनी व्यक्त केला. भाव कमी असतानाही पिकाची काळजी न सोडल्याचा आज सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
