शहरातून परत गावाकडे नवा प्रवास
विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथील किशोर येलेती हे व्यवसायाने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी १० वर्षे एका प्रतिष्ठित कंपनीत वैज्ञानिक म्हणून काम केले. पण शहरातील नोकरीत समाधान नव्हतं. “आपली खरी ओळख मातीशी आहे,” असं त्यांना वाटलं. म्हणूनच त्यांनी नोकरी सोडली आणि आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांनी शेतीला करिअर म्हणून स्वीकारलं आणि नव्या विचारांनी ती आधुनिक केली.
advertisement
सेंद्रिय शेती आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर
किशोर यांनी शेण, शेतीतील कचरा, घरगुती पानांचा कचरा यापासून सेंद्रिय खत तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी गांडूळखत, जीवामृत आणि सूक्ष्मजीव संवर्धन वापरून माती सुपीक केली. ठिबक सिंचनाद्वारे ही नैसर्गिक खते पिकांपर्यंत पोहोचवली जातात. त्यांनी आपल्या शेतात बायोगॅस प्लांट बसवला, ज्यातून खतासह वीज निर्मितीही होते. सौरऊर्जेच्या मदतीने त्यांनी शेतीतील बहुतेक उपकरणे चालवणे शक्य केले आहे. पावसाचं पाणी साठवण्यासाठी तलाव आणि खड्डे तयार करून त्यांनी पाणीटंचाईचं संकटही टाळलं आहे.
तेल पाम लागवडीचा नवा अध्याय
किशोर यांनी सुरुवात केली ती तेल पाम लागवडीपासून आणि हाच त्यांचा यशाचा टर्निंग पॉईंट ठरला. केवळ १२ एकर शेतीतून ते दरवर्षी सुमारे १८.९४ लाखांचे उत्पन्न कमावतात. त्यांचा खर्च ८.३१ लाख असून, निव्वळ नफा १०.६२ लाख इतका आहे. याशिवाय ते मत्स्यपालन, मध उत्पादन आणि आंतरपीक लागवडीतूनही चांगली कमाई करतात.
संघर्षातून शाश्वत शेतीकडे
सुरुवातीला आव्हानं होती बाजारपेठेचा अभ्यास, योग्य पिकांची निवड आणि आर्थिक जोखीम. मात्र, गोदरेज अॅग्रोव्हेट आणि आंध्र प्रदेश सरकारच्या मदतीने त्यांनी आधुनिक पद्धती आत्मसात केल्या. त्यांच्या शेतात आज शाश्वत शेती, पाण्याचं संवर्धन आणि स्वयंपूर्ण ऊर्जावापर याचं आदर्श उदाहरण पाहायला मिळतं.
शेतकऱ्यांना सल्ला काय?
ते म्हणतात की, “फक्त एका पिकावर अवलंबून राहू नका. आंतरपीक, मत्स्यपालन, पशुपालन यांसारखे विविध स्रोत वापरा.” शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील कृषी विज्ञान केंद्रांना भेट द्यावी, नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावं आणि त्याचा वापर आपल्या शेतीत करावा. असा सल्ला किशोर येलेती यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
