महेश दरेकर यांनी उसनवारी करून सुमारे 80 ते 90 हजार रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती. कांदा काढणीसाठी तयार झाला होता आणि तो बाजारात नेण्यासाठी शेतात गोळा करून ठेवला होता. पण पावसाने उघडप न दिल्यामुळे जवळपास 300 गोणी कांदा पावसात भिजला. आता तो विक्रीयोग्य राहिलेला नाही. कर्जबाजारी झालेलं कुटुंब आता हाताशी आलेलं उत्पादन देखील गमावल्यामुळे पूर्णतः खचून गेलं आहे.
advertisement
खतं, बी-बियाण्यांसाठी कुठून पैसा आणायचा?
या कठीण परिस्थितीत दरेकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नाही. महेश दरेकर त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीसह भिजलेला कांदा गोळा करत आहेत. पाच महिन्यांची मेहनत, आर्थिक गुंतवणूक आणि आशा या एका मुसळधार पावसाच्या सरीने नष्ट केल्या आहेत. कर्जाचे हप्ते भरायचे आहेत, मजुरांचे पैसे देणे बाकी आहे आणि त्यातच मुलांची शाळा सुरू होण्याची वेळ आली आहे. खतं, बी-बियाण्यांसाठी कुठून पैसा आणायचा, असा असहाय प्रश्न दरेकर कुटुंबासमोर उभा आहे.
शासनाकडे मदतीची मागणी
महेश दरेकर यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीची शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "इतकी मेहनत करून उभं केलेलं पीक पावसामुळे वाया गेलं. आमचं सगळं आयुष्य या शेतीवर अवलंबून आहे. आम्हाला शासनाने वेळीच मदत केली नाही, तर पुढच्या हंगामात उभं राहणंही शक्य होणार नाही."
जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान
फक्त शिंदेवाडीच नव्हे, तर बीड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वळवाच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. माजलगाव धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली आहे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
