मुंबई : मातीमध्ये घाम गाळणाऱ्या एका सामान्य शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर असामान्य यश मिळवले आहे. बदल स्वीकारण्याची तयारी, अपयशातून शिकण्याची जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे दिल्लीच्या नजफगडजवळील हसनपूर गावातील पवन कुमार आज हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
advertisement
लहान खोलीत व्यवसाय सुरू
दिल्लीतील नजफगड परिसरातील हसनपूर गावात राहणारे पवन कुमार आज देशभरातील नवउद्योजक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. पारंपरिक शेतीतून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत त्यांनी उभारलेला हाय-टेक मशरूम फार्म अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अवघ्या एका लहान खोलीत सुरू झालेला हा प्रयोग आज लाखो रुपयांचा व्यवसाय बनला असून, पवन कुमार यांचे मासिक उत्पन्न सुमारे सात लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःपुरते यश मर्यादित न ठेवता देशातील इतर शेतकऱ्यांनाही या क्षेत्रात उभे राहण्यास मदत केली आहे.
2016 मध्ये घेतला निर्णय
पवन कुमार अनेक वर्षे पारंपरिक पिकांची शेती करत होते. मात्र बदलत्या काळात शेतीत नवे प्रयोग करण्याची गरज ओळखून त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. 2016 मध्ये एका मित्राच्या सल्ल्यानंतर त्यांनी मशरूम शेतीबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांची गुंतवणूक करून 22 बाय 25 चौरस फूट आकाराच्या एका छोट्या खोलीत मशरूम उत्पादन सुरू केले. मशरूमसाठी नियंत्रित तापमान आवश्यक असल्याने त्यांनी एसी, रॅक सिस्टीम आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला.
शहरी भागात राहत असल्यामुळे कंपोस्ट तयार करण्यास परवानगी नसणे ही मोठी अडचण होती. मात्र पवन कुमार यांनी यालाच संधी मानली आणि दर्जेदार कंपोस्ट बाहेरून मागवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कोणतेही ठोस मार्गदर्शन नसल्याने अनेक चुका झाल्या. उत्पादन अपेक्षेइतके मिळाले नाही, आर्थिक अडचणी आल्या. पण त्यांनी हार मानली नाही. अनुभवातून शिकत त्यांनी मशरूम उत्पादनातील बारकावे आत्मसात केले. पहिल्या टप्प्यात एका खोलीतून सुमारे 900 किलो उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी हळूहळू व्यवसाय विस्तारण्यास सुरुवात केली.
2017 पर्यंत त्यांनी तीन खोल्यांमध्ये मशरूम लागवड सुरू केली आणि आज त्यांचा फार्म सुमारे 3,150 चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे. पाच स्वतंत्र खोल्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांत उत्पादन घेतल्यामुळे बाजारात वर्षभर मशरूमचा सातत्यपूर्ण पुरवठा शक्य झाला आहे. सध्या ते दररोज सरासरी 170 किलो बटण मशरूमचे उत्पादन घेत आहेत. यासोबतच पोर्टोबेलो आणि ऑयस्टर मशरूमची लागवडही त्यांनी सुरू केली आहे.
वर्षाला 90 लाखांचे उत्पन्न
या हाय-टेक मशरूम फार्ममधून वार्षिक सुमारे 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. लग्नसराईच्या हंगामात मशरूमची मागणी वाढल्याने दर किलोला 400 रुपयांपर्यंत दर मिळतो, तर इतर काळात हे दर 140 ते 250 रुपयांच्या दरम्यान असतात. या उत्पन्नामुळे पवन कुमार यांच्या कुटुंबाचे जीवनमान बदलले आहे. त्यांच्या व्यवसायात आता पत्नी आणि मुलगाही सक्रिय सहभाग घेत असून, मार्केटिंग आणि कामगार व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
यश मिळाल्यानंतर पवन कुमार यांनी ज्ञान वाटण्याचा निर्णय घेतला. ते नवोदित शेतकरी, उद्योजक आणि संशोधक विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्कात प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात 40 हून अधिक मशरूम उत्पादन युनिट्स सुरू झाली आहेत. पवन कुमार यांचा प्रवास हे दाखवून देतो की योग्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्द असेल तर शेतीही आजच्या काळात अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकते.
