पारंपरिक शेतीत तोटा, त्यामुळे नव्या प्रयोगांकडे वाटचाल
पारंपरिक पिकं हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अनेकदा अपेक्षित उत्पन्न देत नाहीत. शेतकऱ्यांचे खर्च वाढत आहेत परंतु उत्पादनाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आता पिकांचे विविधिकरण करत आधुनिक शेती तंत्राचा वापर करू लागले आहेत. माळरानावर, कोरडवाहू जमिनीतही उच्च मूल्याच्या पिकांचा यशस्वी प्रयोग होत आहे. या प्रवाहातच येवला येथील सुनील सोनवणे यांच्या ड्रॅगन फ्रुट शेतीचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो.
advertisement
दुष्काळी भागातही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
येवला तालुक्यातील हडप सावरगाव हा दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करणारा भाग म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात टँकरवर गावाचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. अशा कठीण परिस्थितीतही सुनील कचरू सोनवणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत दोन एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.
ड्रिप इरिगेशन आणि मल्चिंग या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यावरही पिक वाढते. ड्रॅगन फ्रुट हे कोरडवाहू हवामानात वाढणारे, कमी खर्च आणि उच्च बाजारभाव मिळवून देणारे फळ असल्याने त्यांनी हा पर्याय निवडला.
बाजारात वाढती मागणी, लाखोंचे उत्पन्न
ड्रॅगन फ्रुट हे पोषक तत्वांनी समृद्ध, आरोग्यासाठी उपयुक्त आणि बाजारात चांगल्या किमतीत विकले जाणारे फळ आहे. स्थानिक बाजारपेठेसोबतच अन्य शहरांतील व्यापारीही थेट त्यांच्या शेतात येऊन खरेदी करत आहेत.
या बागेतून शेतकरी सुनील सोनवणे यांना आधीच लाखोंचे उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. वाढती मागणी, चांगला बाजारभाव आणि कमी खर्चामुळे त्यांची शेती आता अधिक नफ्यात चालली आहे. परिणामी, त्यांच्या आर्थिक परिस्थितीतही चांगली सुधारणा झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी
दुष्काळी भागातही आधुनिक शेती तंत्राचा योग्य वापर करून नफ्यातील शेती कशी करता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सुनील सोनवणे यांचे कष्ट आणि नियोजन त्यांच्या यशामुळे आसपासच्या शेतकऱ्यांनाही ड्रॅगन फ्रुटसह इतर पर्यायी पिकांचा विचार करण्याची प्रेरणा मिळत आहे.
