बीड : सध्याचा घडीला अनेक तरुण शेतकरी शेतीकडे वळत आहेत. बीड जिल्ह्यातील हनुमान वानखेडे यांनी आधुनिक शेतीतून स्वतःच्या भाग्याला नवा आयाम दिला आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी त्यांनी आपल्या गावातच शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. शेतीशी संबंधित शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्याच एक एकर शेतजमिनीत टोमॅटोची लागवड करून यशस्वी शेतीची दिशा ठरवली. हनुमान वानखेडे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी टोमॅटोच्या लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. गुणवत्तापूर्ण बियाणे, ठिबक सिंचन, वेळेवर खतांचा वापर आणि आधुनिक कीड नियंत्रणाच्या पद्धती वापरून त्यांनी आपली शेती अधिक उत्पादक बनवली. या प्रयत्नांमुळे त्यांच्या टोमॅटो शेतीला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले.
advertisement
पाहिल्यांदा त्यांनी एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. सुरुवातीला काही आव्हाने आली मात्र नियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्यामुळे त्यांना अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर शेती करण्याचा त्यांनी निर्धार केला. हनुमान यांचा विश्वास आहे की शेतीत प्रचंड संधी आहेत फक्त ती आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची गरज आहे. त्यांच्या मते शेतीत प्रयोगशीलता दाखवल्यास रोजगार निर्माण करण्याबरोबरच आर्थिक स्थैर्यही साध्य करता येते.
फायद्याची शेती! एका एकरात 450 रोपांची केली लागवड, हे झाड करणार शेतकऱ्याला लखपती Video
हनुमान वानखेडे यांची कहाणी ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते. अनेकदा शहरातील नोकऱ्यांचा मागोवा घेताना ग्रामीण युवकांना अडचणी येतात. मात्र हनुमान यांनी शेतीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी केवळ नफा कमवला नाही तर अन्य शेतकऱ्यांसाठी नवीन पद्धती शिकविण्याचा मनोदयही व्यक्त केला आहे. आता हनुमान टोमॅटो शेती अधिक विस्तारण्याचा विचार करत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन त्यासाठी योग्य मार्केटिंगची योजना आखली आहे. त्याशिवाय शीतसाखळी व्यवस्थापनासाठी ते सरकारी योजनांचा लाभ घेण्याच्या तयारीत आहेत. भविष्यात त्यांना टोमॅटो प्रक्रिया उद्योग उभारण्याची योजना आहे ज्यामुळे अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल.
हनुमान यांचा अजून एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक शेती. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करत त्यांनी रासायनिक खतांचा कमी वापर करून शेतीत सातत्य टिकवले आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेत अधिक मागणी आहे. हनुमान वानखेडे यांची कहाणी हे दाखवते की योग्य नियोजन मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते. त्यांच्या या यशाने त्यांनी इतर तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील तरुणांनीही शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहावे आणि आपल्या भागातील संसाधनांचा योग्य वापर करून यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करावे हा त्यांचा संदेश आहे.





