मुंबई : आज अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे धाव घेत असताना, काही मोजकेच जण मातीशी नातं जपत आहेत. आणि शेतीतूनच यशाची नवी वाट तयार करताय. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतीला उद्योगाचे स्वरूप देणारे असेच एक नाव म्हणजे उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्याचे हिमांशू नाथ सिंह. मेहनत, शास्त्रीय दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या जोरावर त्यांनी शेतीतून कोट्यवधी रुपयांची कमाई करत हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत निर्माण केला आहे. चला तर मग जाणून घेऊ त्यांची यशोगाथा..
advertisement
नोकरीला शेती पडली भारी
ऊस आणि केळी लागवडीत केलेल्या प्रयोगांमुळे आज त्यांचे नाव प्रगतीशील शेतकऱ्यांमध्ये अग्रस्थानी घेतले जाते. विशेष म्हणजे शेतीतून मिळणारे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अनेक MNC मध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पगारालाही मागे टाकणारे आहे. सुमारे 1 कोटींपेक्षा जास्त उलाढाल करत त्यांनी शेती हा तोट्याचा व्यवसाय नसून योग्य नियोजन केल्यास अत्यंत नफ्याचा ठरू शकतो, हे दाखवून दिले आहे.
10 हेक्टर जमिनीवर लागवड
आजच्या घडीला कृषी क्षेत्र अनेक अडचणींना सामोरे जात आहे. वाढते उत्पादनखर्च, हवामानातील अनिश्चितता, पाण्याची कमतरता आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी हताश झाले आहेत. मात्र, हिमांशू नाथ सिंह यांनी या सर्व अडथळ्यांवर मात करत शेतीला उद्योगाच्या पातळीवर नेले आहे. त्यांच्या मालकीच्या सुमारे 10 हेक्टर जमिनीवर ऊस आणि केळीची लागवड करून ते दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्यांचे यश केवळ वैयक्तिक नसून, ते इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
हिमांशू नाथ सिंह हे सुमारे 40 वर्षांचा ऊस शेतीचा अनुभव असलेल्या कुटुंबातून आले आहेत. वडिलांकडून त्यांनी पारंपरिक शेतीचे धडे घेतले. मात्र, काळानुसार बदल स्वीकारणे गरजेचे आहे, हे त्यांनी लवकरच ओळखले. त्यामुळे त्यांनी शेतीत वैज्ञानिक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांचा समावेश केला. मातीची गुणवत्ता टिकवण्यासाठी ते सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करतात. शेणखत, गांडूळ खत, सेंद्रिय कंपोस्ट यासोबतच आवश्यक त्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून ते जमिनीची सुपीकता दीर्घकाळ राखतात.
1 कोटींची उलाढाल
ऊस लागवडीत हिमांशू यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वैज्ञानिक आहे. पेरणीची अचूक वेळ, दोन रोपांतील अंतर, सिंचन व्यवस्थापन आणि खतांचा योग्य वापर यावर ते विशेष भर देतात. सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ऊस लागवड करणे त्यांना अधिक फायदेशीर वाटते. ते 0118 आणि 14235 या सुधारित, रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करतात. या पद्धतीमुळे त्यांना प्रति हेक्टर सुमारे 2,470 क्विंटल ऊस उत्पादन मिळते. याच उसातून त्यांच्या शेताची वार्षिक उलाढाल 1 कोटींच्या पुढे जाते.
आंतर पिकाची लागवड
ऊसाबरोबरच हिमांशू केळीचीही लागवड करतात. त्यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात आणि जोखीम कमी होते. शिवाय, ते आंतरपीक पद्धतीचा प्रभावी वापर करतात. ऊस व केळीच्या ओळींमध्ये बटाटा, कोबी, फुलकोबी, मोहरी यांसारखी पिके घेतली जातात. यामुळे मातीची जैवविविधता वाढते, तण नियंत्रणात राहते आणि अतिरिक्त उत्पन्न मिळते. केळी उत्पादनातही ते सेंद्रिय उपायांचा वापर करतात, ज्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि बाजारात चांगला दर मिळतो.
