करडईची लागवड केल्यावर हार्वेस्टिंग करत असताना मजुरांना इजा व्हायची, दुखापत व्हायची, यामुळे मजूर मिळत नव्हते म्हणून करडईचे क्षेत्रफळ कमी होत चालले होते. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत करडईची हार्वेस्टिंग करणे सोपे झाले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक लागवड करडईची केली जात आहे.
advertisement
करडईमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. करडई तेलाचा वापर जेवणामध्ये केल्यामुळे हृदयविकाराच्या समस्या कमी होतात. तर करडईच्या तेलाला बाजारामध्ये सर्वाधिक भाव मिळतो. करडईची लागवड रब्बी हंगामात केली जाते. तर करडईची लागवड 45 बाय 20 सेंटीमीटरवर केली जाते. करडईची लागवड केल्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर मावा किंवा कीड रोगाचा परिणाम होऊ नये म्हणून यासाठी फवारणी घ्यावी लागते. मावा आणि कीड रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचा म्हणजे महागड्या औषधांचा वापर न करता रोगर नावाचे औषध देखील फवारणी केले तर मावा आणि कीड रोगाचे नियंत्रण होते.
करडईची लागवड केल्यावर त्यामध्ये दाणे भरत असताना हलक्या स्वरूपाचे जर पाणी दिले तर दुप्पट उत्पन्न या करडईच्या पिकातून शेतकऱ्यांना मिळते. जर जास्त पाणी दिले तर उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. तर करडईला बाजारामध्ये साडेसहा हजार रुपये ते साडेदहा हजार रुपये पर्यंत भाव मिळतो. कमी खर्च आणि जास्त उत्पादन देणारे पीक करडईचे असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सोलापूर येथील विभागातून जवळपास 7 टन बियाणे करडईच्या लागवडीसाठी 8 दिवसांत विक्री झाले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटक राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी करडईच्या बियाणे लागवडीसाठी घेऊन जातात. शेतकऱ्यांना शेतामध्ये कोणते पीक घ्यावे सुचत नसेल तर एकदा करडईची लागवड करून पाहावी. नक्कीच उत्पन्न कमी खर्चात जास्त मिळेल असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सोलापूर विभागात कार्यरत असलेल्या अर्चना पवार यांनी दिला आहे.





