सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही तुरीची लागवड झालेली आहे. तूर पिकाची लागवड खरीप हंगामात होते आणि त्याची तोडणी रब्बी हंगामात होते. तूर या पिकावर जवळपास 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारचे किडींचे रोग तसेच वेगवेगळ्या प्रकारचे 10 रोग पाहायला मिळतात. तूर या पिकावर हिरवी घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी, शेंगा पोखरणारी हिरवी अळी, माशीची अळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आढळतात. त्यामुळे तूर या पिकावर एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
advertisement
तूर पिकामध्ये आंतर पिकाची लागवड केल्यास या किडीचे प्रमाण कमी होईल. तसेच तूर लागवडीच्या वेळी ज्वारीची बियाणे 250 ग्रॅम प्रति हेक्टर जागी लावावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी 5 कामगंध सापळे शेतामध्ये लावावे आणि पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क 5% ची फवारणी करावी.
तुरीवर वांझ हा विषाणूजन्य रोग प्रामुख्याने येतो. या रोगामुळे तुरीच्या पानावर गोलाकार पिवळे ठिपके येतात तसेच पिवळसर हिरवे चट्टेही पानावर दिसतात. तसेच तुरीचे झाड खुंटते आणि तूर या पिकास फुल आणि फळधारणा होत नाही. या रोगापासून तुरीला वाचवायचे असेल तर 20 मिली 10 लिटर पाण्यात डायकोफोल अथवा गंधक टाकून वेळेत फवारणी करावी. तसेच ज्या तुरीच्या झाडावर वांझ रोग असेल ते झाड समूळ नष्ट करावेत. अशाप्रकारे तुरीची योग्य ती काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळेल, असा सल्ला मोहोळ तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर पंकज मडावी यांनी दिला.