आंबा हे राज्यातील महत्त्वाचे फळपीक आहे. यामुळे पिकाचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. आंबा पिकावर तुडतुडे ही महत्त्वाची कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव आंबा पिकावर वर्षभर पाहायला मिळतो. परंतु, आंब्यांना फुलोरा अवस्थेत ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. तुडतुडे नावाचे कीटक रस शोषण करतात. यामुळे मोहर गळून जातो.
advertisement
फवारणी कधी करावी?
दहा किडे प्रती पालवी किंवा मोहर आढळून आल्यास त्यांचे नियंत्रण करणे गरजेचे असते. यासाठी जैविक कीटकनाशकामध्ये निंबोळी अर्क 1 मिली प्रती लिटर याप्रमाणे फवारणी करावी. मेटारायझीयमची चार ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये बिफ्रोबेन्झीन 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा क्रोनिकामिल नावाचे कीटकनाशक दहा लिटर पाण्यात चार ग्रॅम टाकून फवारणी करावी. किंवा थायमाथॅक्झोन नावाच्या कीटकनाशकाचा वापर देखील केला जाऊ शकतो.
आंबा पिकावरील तुडतुडे या किडींचे वेळीच नियंत्रण केलं नाही तर 30 ते 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सुचवलेल्या कीटकनाशकांची गरजेप्रमाणे फवारणी केल्यास होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल, असं कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील पिक संरक्षण विभागातील कृषी तज्ज्ञ अजेय मिटकरी यांनी सांगितले.





