जालना : उत्तर भारतात वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे मोसंबीचे दर गडगडल्याचे पाहायला मिळत आहे. मृगभाराच्या मोसंबीला केवळ 8 ते 12 रुपये प्रति किलो याप्रमाणे दर जालना शहरातील बाजार समितीत मिळत आहे. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. झालेला खर्च देखील या भावामध्ये वसूल होणे कठीण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मोसंबीला किमान 25 ते 30 हजार रुपये प्रति टन एवढा दर मिळावा अशा भावना शेतकऱ्यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केल्या.
advertisement
संपूर्ण मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर बीड, परभणी, धाराशिव या जिल्ह्यातही मोसंबीची लागवड आहे. जालना शहरात तसेच पाचोरा या ठिकाणी मोसंबीचे मोठे मार्केट आहे. सध्या शेतकरी मृगभाराची मोसंबी विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहे. पंधरा दिवसांनी मृग बहार मोसंबीला 12 ते 18 हजार रुपये प्रति टन एवढा दर होता. तर आंब्या बहार मोसंबीला 35 ते 40 हजार रुपये प्रति टन एवढा दर मिळत होता.
शेतकऱ्याच्या लेकाची कमाल, काश्मिरचं ‘सोनं’ घरात उगवलं! आता ब्रॅंडच तयार केला
मात्र उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी असल्याने दरांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. आता जालना शहरातील बाजारात केवळ 8 ते 12 हजार रुपये प्रति टन एवढा दर मोसंबीला मिळत आहे. तर थंडी वाढल्याने मोसंबीची आवक देखील कमीच आहे. सध्या दररोज 50 ते 100 टनांच्या आसपास मोसंबीची आवक होत आहे.
सात क्विंटल मोसंबी आणली. तिला 10 ते 12 हजार रुपये एवढा भाव आहे. या भावात मोसंबी पिकवणे आम्हाला अजिबात पुरत नाही. 30 रुपये प्रति किलो एवढा दर मिळाला हवा तरच मोसंबी शेती करणे फायद्याचे ठरेल. अन्यथा मोसंबी आम्हाला रस्त्यावर फेकावी लागेल, अशी संतप्त भावना मोसंबी उत्पादक शेतकरी हिम्मतराव देवराय यांनी व्यक्त केली.
उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे. थंडीमध्ये मोसंबीचा वापर फार कमी प्रमाणात होतो. ज्यूससाठी उत्तर भारतात जालना येथील मोसंबी जाते. थंडीमुळे उत्तर भारतात मोसंबीला मागणी कमी झाल्यामुळे जालना मार्केटमध्ये तसेच इतर बाजारांमध्ये 8 ते 12 हजार रुपये प्रति टन या भावाने मोसंबीची विक्री होत आहे. तसेच हा दर थंडी असेल तोपर्यंत कायम राहील. थंडी संपल्यानंतर, तापमान वाढले की मोसंबीचे दर नक्कीच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मोसंबी विक्रीची घाई करू नये. 15 फेब्रुवारी नंतर मोसंबीचे दर निश्चित वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान दीड महिना मोसंबी विक्रीस आणू नये, असे आवाहन मोसंबी अडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांनी शेतकऱ्यांना केले आहे.





