बीजप्रक्रिया महत्वाची का असते?
बीजप्रक्रिया ही फक्त कीड आणि रोगांपासून संरक्षण देणारी प्रक्रिया नसून ती पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि जमिनीतील अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रकारे बीजप्रक्रिया केल्यास उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होते तसेच रासायनिक खतांचा खर्चही कमी होतो.
विशेषतः हरभरा, गहू, ज्वारी आणि मका यांसारख्या रब्बी पिकांसाठी बीजप्रक्रिया ही रोगप्रतिकारक कवचासारखी कार्य करते. या प्रक्रियेमुळे बुरशी, बुरशीजन्य रोग, तसेच मातीतील हानिकारक जिवाणूंपासून संरक्षण मिळते.
advertisement
जैविक आणि रासायनिक प्रक्रियेचे फायदे
हरभरा, मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या द्विदल पिकांसाठी रायझोबियम आणि पीएसबी (Phosphate Solubilizing Bacteria) जिवाणू खतांचा वापर फायदेशीर ठरतो. हे जिवाणू वातावरणातील नत्र स्थिरीकरण करून जमिनीची सुपीकता वाढवतात.
गहू, ज्वारी, मका आणि बार्ली या पिकांसाठी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी यांच्या प्रक्रियेने स्फुरदाचे शोषण वाढते, ज्यामुळे पिकांची वाढ जलद आणि निरोगी होते.
तज्ज्ञांच्या मते, शिफारशीनुसार रासायनिक आणि जैविक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादन खर्च घटतो आणि पर्यावरणपूरक शेतीस चालना मिळते.
बीजप्रक्रियेच्या महत्त्वाच्या सूचना
प्रथम रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर किमान अर्धा तासाने जैविक खताची प्रक्रिया करावी.दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी करू नयेत. प्रक्रिया करताना हातमोजे वापरणे आवश्यक आहे. गुळाच्या पाण्याचा हलका शिडकावा करून जिवाणू खत बियाण्याला नीट चिकटेल याची काळजी घ्यावी. भुईमूगसारख्या नाजूक बियाण्यांवर चोळणे टाळावे, कारण त्याने बियाण्यांचे नुकसान होऊ शकते.
तज्ज्ञांचा सल्ला
कृषी विभाग आणि तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शासनमान्य कृषी विक्रेत्यांकडूनच बीजप्रक्रियेसाठी आवश्यक निविष्ठा खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अवैध किंवा नकली उत्पादनांचा वापर टाळावा, कारण त्याचा परिणाम थेट पिकांच्या आरोग्यावर होतो.
एकूणच, यंदाच्या ओलसर वातावरणात बीजप्रक्रिया करणे म्हणजे पिकांसाठी सुरक्षा कवच निर्माण करण्यासारखे आहे. ही प्रक्रिया केवळ रोगप्रतिबंधक नसून उत्पादनात वाढ आणि खर्चात बचतही घडवून आणते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने रब्बी हंगामातील पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया नक्की करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
