मोहीमेचा उद्देश आणि कार्यपद्धती
महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत, 1 मार्चपासून ही मोहीम सुरू होणार आहे. या अंतर्गत,सातबारा उताऱ्यावर मयत खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे.वारसांना त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित सर्व अधिकृत कागदपत्रे वेळेत मिळावीत,हा यामागील मुख्य उद्देश आहे.
'ई-हक्क' प्रणालीतून सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया
वारस नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी 'ई-हक्क' प्रणाली वापरण्यात येणार आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांनी हा उपक्रम वेळेत पूर्ण करावा,असे निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement
1 ते 31 मार्चदरम्यान टप्प्याटप्प्याने अमलबजावणी आहे
1 ते 5 मार्च - प्रत्येक गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) हे त्यांच्या क्षेत्रातील मयत खातेदारांची यादी तयार करतील.
6 ते 15 मार्च - वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करावीत. तलाठी आणि मंडळ अधिकारी स्थानिक चौकशी करून वारस ठराव मंजूर करतील.
16 ते 31 मार्च - वारस फेरफार प्रक्रियेची अंतिम अंमलबजावणी करून त्यास अधिकृत मंजुरी दिली जाईल.
अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने वारसांना मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतजमिनीच्या हक्कांसाठी आवश्यक असलेले कागदपत्र मिळणे अधिक सोपे होणार आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
खातेदाराचा मृत्यू दाखला (मूळ किंवा प्रमाणित प्रत)
सर्व वारसांच्या जन्मतारखेचा पुरावा
आधारकार्डच्या साक्षांकित प्रती
वारस संबंधी शपथपत्र आणि स्वयंघोषणापत्र
अर्जात नमूद केलेला पत्ता व संपर्क क्रमांक
‘जिवंत सातबारा मोहिमे’चे महत्त्व काय आहे?
सातबारावर वारसांच्या नोंदी अद्ययावत करणे ही एक किचकट प्रक्रिया आहे, आणि अनेक वारसांना त्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवण्यात येत आहे.
