जालना : पारंपारिक पिके घेऊन शेतीमधून फारसं उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल नवनवीन पिके घेण्याकडे वाढला आहे. मात्र यामुळे काही जुनी पिके नष्ट होण्याच्या देखील मार्गावर आहेत. मात्र काही जुनी जाणती मंडळी या नष्ट होत असलेल्या पिकांना जतन करण्याचा प्रयत्न करत असतात. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील खंडू भागवत या वृद्ध शेतकऱ्याने म्हाळू या कंद मुळाच्या शेतीमधून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. केवळ 3 गुंठ्यात 70 हजारांचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे.
advertisement
कंदमुळाची कोणतीही शेती ही करण्यासाठी कष्टदायक असते. त्यातच म्हाळूची शेती अधिक कष्टप्रद असल्याने कोणीही शेतकरी लवकर ही शेती करण्यास धजत नाहीत. मात्र टेंभुर्णी येथील वयोवृद्ध शेतकरी खंडू भागवत दरवर्षी शेतात म्हाळूची लागवड करतात. यंदा त्यांनी मार्चमध्ये 3 गुंठ्यात म्हाळू लावले होते. सध्या म्हाळू काढणे सुरू असून, यातून जवळपास 60 ते 70 हजारांचे उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
22 दिवसांमध्ये पिक हातात, खर्च फक्त 10 हजार; 3 लाख कमाईची हमी!
लागवड कमी असल्याने बाजारात मोठी मागणी
रताळाप्रमाणे म्हाळूचा वापरही अनेकजण उपवासासाठी करतात. शिवाय अनेकजण म्हाळूची भाजीही करतात. आपल्या परिसरात याची जास्त लागवड होत नसल्याने बाजारात याला मोठी मागणी असते. म्हाळूची झाडे उंच पानवेलीप्रमाणे वाढतात. मात्र, त्याचे कंद हे जमिनीत खोलवर वाढते. त्यामुळे जमिनीत खोलवर खोदून फुटू न देता म्हाळू बाहेर काढणे फार जिकिरीचे काम आहे. त्यानंतर हे म्हाळू शिजवून विकावे लागतात. सध्या बाजारात म्हाळूला 80 ते 100 रुपये किलोचा भाव मिळत आहे. या शेतीची आवड लागल्याने यासाठी उचलावे लागणारे कष्टही फारसे जाणवत नाहीत, असं शेतकरी खंडू भागवत यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये म्हाळूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आयुर्वेदातही म्हाळूच्या सेवनाचे अनेक फायदे तसेच महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे म्हाळूला बाजारात चांगली मागणी असते. खंडू भागवत हे आठवडी बाजारामध्ये 80 ते 100 रुपये प्रति किलो या दराने म्हाळूंची विक्री करत आहे. ही शेती कष्टदायक असली तरी सवय झाल्याने आणि चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने नियमित करत असल्याचे भागवत यांनी सांगितलं.





