लातूरच्या छोट्या गावातून उभा राहिला मधाचा व्यवसाय
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला या छोट्याशा गावातील परमेश्वर हुरदळे हा बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला तरुण आहे. पारंपरिक नोकरीच्या मागे न लागता त्याने वेगळा मार्ग निवडत मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला. जिथे अनेकांना धोका वाटतो, तिथे त्याने संधी पाहिली आणि निसर्गाशी मैत्री करत स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कष्ट, प्रयोगशीलता आणि नैसर्गिक उत्पादनांवरील विश्वास यांच्या जोरावर त्याने मधमाशी पालनातून स्वतःचा ब्रँड तयार केला. नागपूर येथे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनात त्याच्या मधाच्या विविध फ्लेवर्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचा व्यवसाय अधिक वेगाने वाढू लागला.
नैसर्गिक मधाचे वेगवेगळे प्रकार
परमेश्वरने बाजारात केवळ पारंपरिक मधच नव्हे तर विविध नैसर्गिक फ्लेवर्सचा मधही उपलब्ध करून दिला आहे. मोहरीच्या फुलांच्या परागातून तयार होणारा सुगंधी मध, गुजरातचा ओवा आणि बडीशेप – पचनासाठी उपयुक्त आणि वेगळी चव असलेला मध, हिमाचल-काश्मीरचा जंगली मध जो हिमालयातील औषधी वनस्पतींच्या परागातून तयार होणारा दुर्मीळ मध, झारखंडची तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा तुळशीचा मध
याशिवाय आले, हळद, दालचिनी आणि ड्रायफ्रूट्स मिश्रित मधाचेही उत्पादन तो करतो. या सर्व उत्पादनांमध्ये कोणतेही रसायन किंवा कृत्रिम फ्लेवर्स वापरले जात नाहीत. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांमध्ये त्याच्या मधाला मोठी मागणी निर्माण झाली आहे.
महिन्याला दोन हजार किलो उत्पादन
अल्पावधीतच परमेश्वरच्या व्यवसायाने मोठी झेप घेतली आहे. सध्या त्याच्याकडे महिन्याला सुमारे दोन हजार किलो मधाचे उत्पादन होते. वर्षभरात जवळपास २५ हजार किलो मध तयार करून तो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करतो. शुद्ध आणि नैसर्गिक मध असल्यामुळे त्याच्या उत्पादनांना मोठी मागणी असून या व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
महिलांनाही रोजगाराची संधी
या व्यवसायामुळे केवळ परमेश्वरच नव्हे तर स्थानिक महिलांनाही रोजगाराची संधी मिळाली आहे. बचतगटांच्या महिलांना मध संकलन, प्रक्रिया आणि पॅकिंगसाठी काम दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होण्यासही मदत झाली आहे.
ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण
ग्रामीण भागातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे वळतात. मात्र निसर्गातील संधी ओळखून स्वावलंबी कसे व्हायचे, याचे प्रेरणादायी उदाहरण परमेश्वर हुरदळे यांनी घालून दिले आहे. राज्याच्या ‘उमेद’ उपक्रमाचाही त्याच्या कल्पकतेला आधार मिळाला आहे.
