रमेश घुगे हे बदनापूर तालुक्यातील भरडखेडा या छोट्याशा गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांना सुरुवातीपासूनच शेती मातीची आवड आहे. वडिलांच्या प्रेरणेने आणि रमेश घुगे यांच्या कल्पकतेने त्यांनी आपल्या साडेचार एकर क्षेत्रात चारशे खजूर झाडांची 25 बाय 25 या अंतरावर लागवड केली. खजुराची रोपे गुजरात येथून मागवली. प्रति रोपासाठी 4 हजार रुपये खर्च आल्याचं घुगे सांगतात.
advertisement
400 झाडांतून 40 लाखांचं टार्गेट
तीन वर्ष सेंद्रिय पद्धतीने या झाडांची निगा राखली. दरम्यानच्या काळात सोयाबीन सारखी आंतरपिकेही घेता आली. चौथ्या वर्षीपासून खजूर उत्पादनास सुरुवात झाली. यंदा झाडांना भरघोस खजूर लगडले असून एका झाडावर साधारणपणे एक ते दीड क्विंटल खजूर आहेत. या खजुरांना बाजारात साधारणपणे दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलो असा दर मिळतो. 400 झाडांपासून त्यांना 30 टन खजुराचे उत्पादन अपेक्षित असून यातून त्यांना 35 ते 40 लाखांचं उत्पन्न होणार आहे.
दरम्यान, शेतीकडे पारंपारिक दृष्टिकोनातून न पाहता व्यवसायिक दृष्टीतून पाहिल्यास तो फायद्याचा व्यवसाय आहे. जास्तीत जास्त तरुणांनी शेती क्षेत्रात यावं. त्याला उद्योग म्हणून पहावं आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत, असे आवाहन घुगे यांनी तरुणांना केले आहे. तसेच या खजुरांची समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई येथे तसेच ड्रायफ्रूट म्हणून आखाती देशात निर्यात करण्याचा देखील त्यांचा विचार आहे.