जालना : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करता यावा म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 राबविण्यात येत आहे. यानुसार जालना जिल्ह्यामध्ये 70 उपकेंद्रांच्या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये यापैकी दोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यास महावितरणला यश आले आहे तर 13 ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. 26 प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली असून लवकरच सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्याचे महावितरणचे लक्ष आहे.
advertisement
जालना जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या दोन सौर ऊर्जा प्रकल्पांमधून तब्बल 12 हजार शेतकऱ्यांना दिवसा पुरवठा करणे शक्य होणार आहे. हीच उपयुक्तता लक्षात घेऊन आणखी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण तसेच स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासह शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक दर्जाचा अधिकारी देण्याची मागणी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांसह स्थानिकांची समजूत काढून येत्या जूनपूर्वी सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
अशाच पद्धतीने जिल्ह्यात 70 प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फीडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरविण्यात येणार आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्रामुख्याने शासकीय जमीन घेण्यात येत असून 70 पैकी 26 ठिकाणी अशी जमीन महावितरणला हस्तांतरित झाली. तर जेथे सरकारी जमीन उपलब्ध नाही, तेथे खासगी जमीन घेण्यास परवानगी आहे. मात्र काही ठिकाणी सरकारी जमिनीवर शेतकरी तसेच अतिक्रमणे आहेत तर कुठे ग्रामस्थ विरोध करत आहेत. त्यामुळे प्रकल्प मुदतीत अडथळे येत असल्याचे महावितरणने सांगितले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली असून सदर प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता सर्व विभागांच्या समन्वयाने काम करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांना याबाबत सूचना केल्या असून येत्या जूनपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यामुळे तब्बल 12 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे जालना येथील अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी सांगितले.





