६६ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण
सांगली जिल्ह्यात एकूण ७ लाख ५१ हजार ५२३ शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ४९२ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी केली आहे. म्हणजेच सुमारे ६६ टक्के शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अद्याप २ लाख ५२ हजार ९८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही.
शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती अॅग्रीस्टॅक प्रणालीमध्ये नोंदवली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी न केल्यामुळे प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
advertisement
कर्जमाफीच्या लाभावर प्रश्नचिन्ह
अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना भविष्यातील कर्जमाफी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. शासनाच्या कर्ज निवारण प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात असणे आवश्यक आहे. नोंदणी अपूर्ण राहिल्यास त्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर नोंदवली जाणार नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असतानाही अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात,अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कागदपत्रांतील त्रुटींमुळे अडथळे
अनेक प्रकरणांमध्ये आधारकार्ड, फार्मर आयडी किंवा इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळेही नोंदणी प्रक्रिया अडकत आहे. काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे अर्ज अपूर्ण राहतात.
याशिवाय काही शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी सुरू केली असली तरी ती अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीमध्ये त्यांची माहिती पूर्णपणे नोंदली जात नाही.
बँका आणि सहकारी संस्थांकडून माहिती संकलन
कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली माहिती संकलित करण्याचे काम सध्या जिल्ह्यात वेगाने सुरू आहे.जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील गोळा केला जात आहे.
ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली जात असून त्यावरून पुढील योजना आखल्या जाणार आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आधारकार्ड, अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर आवश्यक कागदपत्रे संस्थांकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे माहिती अपूर्ण राहत असून बँकांनाही नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत आहेत.
तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन
प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी जवळच्या सेवा सहकारी संस्थेशी किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेशी संपर्क साधून आवश्यक माहिती जमा करावी, असे सांगण्यात आले आहे.
जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे त्वरित सादर करण्याचे आवाहन केले आहे. “शेतकऱ्यांनी आधारकार्ड, अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर कागदपत्रे वेळेत जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यातील कर्जमाफी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
