आधुनिक शेतीतून यशाचा प्रवास
नारायण यांनी पारंपरिक शेतीपद्धतीऐवजी आधुनिक आणि शास्त्रीय शेती तंत्राचा अवलंब केला. त्यांनी अद्रक (आलं) लागवडीसाठी योग्य माती, सिंचन आणि पोषण तंत्राचा संगम साधला. लागवडीपूर्वी जमिनीत युरिया, डीएपी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करून जमिनीची ताकद वाढवली. निंबोळी पेंड, कार्बोफेरम आणि ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक उपायांचा वापर करून अळी व कीड रोगांवर नियंत्रण मिळवले. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाला आणि पिकाची गुणवत्ता टिकून राहिली.
advertisement
बुरशीनाशकांचा संतुलित वापर
आलं पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अळी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. परंतु नारायण यांनी परिस्थितीवर त्वरीत नियंत्रण मिळवत कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली योग्य अँटिबायोटिक आणि बुरशीनाशकांचा वापर केला. याशिवाय त्यांनी सड रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा आणि सेंद्रिय औषधांचा वापर केला. दोन वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातील गाळ आपल्या शेतात टाकून त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवली, ज्याचा थेट फायदा या हंगामात मिळाला.
लाखोंचे उत्पादन कसं मिळवलं?
फक्त २ एकर शेतीतून १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवणे ही छोटी गोष्ट नाही. यामागे शास्त्रीय दृष्टिकोन, नियोजनबद्ध सिंचन, आणि सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर आहे. त्यांनी ठिबक सिंचन प्रणाली बसवली असून पाण्याचा वापर कार्यक्षमतेने केला. रोग नियंत्रणासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करून खर्च कमी ठेवला. त्यामुळे उत्पादन अधिक आणि खर्च कमी झाला.
तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण
नारायण चंद यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्व तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितले, "शेतीला बेभरवशाची मानून दूर राहण्यापेक्षा शेतीत नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. मेहनत आणि विज्ञान यांचा संगम साधला तर यश हमखास मिळते," असे नारायण चंद म्हणतात.
दरम्यान, अनेक तरुण शेतीकडे दुय्यम दृष्टीने पाहतात, परंतु नारायण चंद यांच्यासारख्या तरुणांनी दाखवून दिले की शेती ही देखील उच्च उत्पन्न देणारी व्यवसायिक संधी ठरू शकते. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय नियोजन आणि प्रयोगशील वृत्ती यांच्या मदतीने त्यांनी केवळ आर्थिक स्थैर्य मिळवले नाही, तर ग्रामीण भागात आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श उभा केला आहे.
