कापसापासून फळबागेपर्यंत प्रवास
संतोष देशमुख यांच्याकडे एकूण सहा एकर शेती आहे. सुरुवातीच्या काळात ते कापूस विक्रीचा व्यवसाय करीत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी या व्यवसायात त्यांना तब्बल १९ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. या अनुभवातून त्यांनी शिकून घेतलं आणि पारंपरिक शेतीऐवजी फळबागेचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
2003 साली त्यांनी सिंधुदुर्ग येथून 220 रुपये प्रति रोप या दराने चिकूची 40 रोपं खरेदी केली आणि आपल्या एका एकर शेतीत ती लागवड केली. सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांनी पिकाची निगा राखण्यात मोठी मेहनत घेतली. त्याचा परिणाम असा झाला की आज त्यांच्या शेतात दरवर्षी सुमारे 40 क्विंटल चिकूचे उत्पादन मिळत आहे. बाजारात या फळाला 30 रुपये प्रति किलो दर मिळतो आणि त्यामुळे वर्षाकाठी सुमारे 2 लाख 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे या विक्रीत त्यांचा खर्च अत्यंत कमी आहे, कारण एकदा बाग फुलल्यानंतर देखभाल खर्च मर्यादित राहतो.
advertisement
खरबूज लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न
चिकूसोबतच संतोष देशमुख दरवर्षी आपल्या चार एकर जमिनीत खरबूज (मेलन) ची लागवड करतात. ही लागवड अल्प कालावधीत उत्पादन देणारी असल्याने त्यांनी ती पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारली. खरबूज लागवडीसाठी त्यांना सुमारे 4 लाख 10 हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, बाजारात या फळाला सातत्याने मागणी असल्याने वर्षाकाठी त्यांना 11 लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. अशा प्रकारे कमी खर्चात आणि योग्य नियोजनाने त्यांनी शेतीला फायदेशीर व्यवसायात बदलले आहे.
शेतीतील वेगवेगळे प्रयोग ठरले यशस्वी
संतोष देशमुख यांचा हा प्रयोग आता अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ते सांगतात की, “फळबाग म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक आहे, पण योग्य काळजी घेतल्यास ती वर्षानुवर्षे उत्पन्न देते. बाजारात फळांना कायम मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रयोगांना घाबरू नये.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, फळबागेमुळे शेती स्थिर उत्पन्न देणारी होते, तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. आज संतोष देशमुख यांच्या चिकू आणि खरबूज शेतीकडे आसपासच्या गावातील शेतकरी अभ्यासासाठी येतात.
