केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan)’ योजनेचा २१ वा हप्ता आगाऊ जारी केला. या अंतर्गत ८.५५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १७१ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. यात ८५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत
advertisement
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांना अलीकडच्या पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने मदत तत्काळ पोहोचवण्यासाठी हा हप्ता वेळेपूर्वी जारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार प्रत्येक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या उत्पन्नाचे रक्षण करणे हीच आमची प्राथमिकता आहे.”
पंजाब आणि हिमाचललाही मिळाला आगाऊ हप्ता
जम्मू-काश्मीरपूर्वी पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनाही पीएम किसानचा २१ वा हप्ता आगाऊ देण्यात आला होता. दोन्ही राज्यांनाही नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला होता—पंजाबला पुरामुळे तर हिमाचलला भूस्खलन आणि खराब हवामानामुळे नुकसान झाले. केंद्र सरकारने या दोन्ही राज्यांच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आगाऊ आर्थिक सहाय्य दिलं.
महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर
दरम्यान, महाराष्ट्रातही परिस्थिती काही वेगळी नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, नद्यांना आलेले पूर आणि पाण्याचा प्रकोप यामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हजारो शेतकऱ्यांच्या फळबागा, भातशेती आणि भाजीपाला क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. अनेक भागांमध्ये जमीन खरडून गेली असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच ३१ कोटी रुपयांचे पूरग्रस्त शेतकरी मदत पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा आगाऊ हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही.
महाराष्ट्राला कधी मिळणार हप्ता?
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीएम किसानचा हप्ता वेळेपूर्वी दिला, तर महाराष्ट्रातील बाधित शेतकऱ्यांना तोच लाभ का दिला जात नाही? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.