२७ लाख शेतकऱ्यांना थेट मदत
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २६ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे २१ व्या हप्त्याचे वितरण केले. या अंतर्गत तब्बल ५४० कोटी रुपये थेट २७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांनाही लवकरच हप्त्याची रक्कम वितरित केली जाईल. तथापि, या वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
advertisement
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
पूरग्रस्त राज्यांतील शेतकऱ्यांना मदत देताना कृषिमंत्री चौहान म्हणाले की, “सध्याच्या संकटाच्या काळात केंद्र सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि पुन्हा शेती सुरू करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल.” त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करताना या हप्त्यामुळे त्यांना केवळ घरगुती गरज भागवता येणार नाही, तर रब्बी हंगामातील बियाणे आणि खते खरेदी करून पेरणीची कामेही वेळेवर सुरू करता येतील, असे सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार?
उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना २१ वा हप्ता कधी मिळणार, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी दिवाळी २० आणि २१ ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता सणापूर्वीच जमा झाल्यास तो त्यांच्यासाठी खरी दिवाळी भेट ठरेल.
पीएम-किसान योजनेचे महत्त्व
२०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जातात. यापैकी प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा असतो. आतापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेतून थेट बँक खात्यात पैसे मिळाले आहेत. यामुळे पारदर्शकता वाढली असून शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत पोहोचते आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने पुरग्रस्त राज्यांतील शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवून त्यांना मोठा दिलासा दिला आहे. उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांसाठी २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू असली तरी तो दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता आहे.