Pune Bus: तब्बल 30 वर्षानंतर पुण्यातील रस्त्यांवर डबल डेकर, ट्रायल रन सुरू, तिकीट दर किती? संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Bus: पुणेकरांना तब्बल 30 वर्षांनी आरामदायी डबल डेकर बसचा प्रवास करता येणार आहे. लवकर 20 गाड्या परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
पुणे: वाहतूक कोंडीने हैराण पुणेकरांना आता आरामदायी आणि खास बसने प्रवास करता येत आहे. तब्बल 25 ते 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा डबल डेकर बस पुण्यात धावताना दिसू लागली आहे. पुणेकरांच्या उत्सुकतेला आणि आकर्षणाला साजेसा हा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला असून, या बसची नुकतीच चार मार्गांवर यशस्वी ट्रायल रन घेण्यात आली. या प्रयोगानंतर आता आणखी दहा डबल डेकर बस पुण्यात आणण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
पीएमपीच्या वतीने शहरातील चार मार्गांवर डबल डेकर बसची ट्रायल रन घेण्यात आली. या ट्रायलमध्ये प्रत्यक्ष प्रवाशांना बसवून सेवा तपासण्यात आली. प्रवाशांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून, प्रवास सोयीस्कर आणि आकर्षक असल्याचे त्यांना वाटले. पुणेकरांसाठी ही एक वेगळीच अनुभूती असल्याने या बसचे शहरवासीयांमध्ये मोठे आकर्षण ठरले आहे.
advertisement
ट्रायल यशस्वी झाल्यानंतर पीएमपी प्रशासनाने आणखी दहा डबल डेकर बस पुण्यात आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असून, संचालक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतरच या बस पुण्यात दाखल होणार आहेत. पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रदूषणमुक्त सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या बस महत्त्वाच्या ठरणार आहेत. बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर पुण्यात लवकरच डबल डेकर बस प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
advertisement
एका डबल डेकर बसची किंमत साधारणपणे दोन कोटी रुपये आहे. मात्र पीएमपी या बस थेट खरेदी करण्याऐवजी भाडेतत्त्वावर आणण्याचा विचार करत आहे. आर्थिक भार कमी ठेवत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डबल डेकर बसची उंची लक्षात घेता काही ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि परंब्या अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आणि पीएमपी संयुक्तरीत्या प्रयत्न करणार आहेत. अडथळे दूर केल्यानंतरच ही सेवा मोठ्या प्रमाणात सुरु होऊ शकेल.
advertisement
बडदे यांनी सांगितलं की, “सध्या ट्रायल रनसाठी प्रवाशांना 100 रुपयांचा डे पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे एकाच पासवर प्रवाशांना दिवसभरात डबल डेकर बसचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. प्रवाशांमध्ये या बसविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे. या डबल डेकर बस प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतील, असे पीएमपी प्रशासनाचे स्पष्ट धोरण आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
advertisement
डबल डेकर बस ही फक्त प्रवासाची साधने नसून ती पुणेकरांसाठी एक वेगळी ओळख आहे. अनेक वर्षांनी पुन्हा या बस रस्त्यावर दिसू लागल्याने पुणेकरांचा उत्साह वाढला आहे. आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर लवकरच आणखी दहा बस शहरात दाखल होणार असून, पुणेकरांना एका नव्या अनुभवाची भेट मिळणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 30, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Bus: तब्बल 30 वर्षानंतर पुण्यातील रस्त्यांवर डबल डेकर, ट्रायल रन सुरू, तिकीट दर किती? संपूर्ण माहिती