राज्यातील सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ती पुढील 10 दिवस सुरू राहील. शासनाने यासाठी किमान आधारभूत किंमती (MSP) जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मुगासाठी 8,768 रु प्रति क्विंटल, उडीदासाठी 7,008 रु प्रति क्विंटल, तर सोयाबीनसाठी 5,328 रु प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
ही खरेदी प्रक्रिया नाफेड (NAFED) आणि राज्य कृषी विपणन मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रे सुरू केली जात आहेत. नागपूर जिल्ह्यात भिवापूर, कळमेश्वर, काटोल, उमरेड, नरखेड, सावनेर आणि रामटेक या ठिकाणी खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांची विक्री याच केंद्रांवर करायची असून, त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
नाफेडकडून सोयाबीन खरेदीसंबंधी महत्त्वाच्या सूचना
नाफेडकडून हमीभावाने सोयाबीन विक्री करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ऑनलाइन किंवा सेवा केंद्रामार्फत नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीशिवाय कोणताही शेतकरी खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
७/१२ व ८अ उतारा (ताज्या पिकासह माहिती असलेला)
आधार कार्ड (शेतकऱ्याच्या नावावर असलेले)
बँक पासबुक (IFSC कोडसहित स्पष्ट प्रत)
मोबाईल क्रमांक (OTP मिळण्यासाठी सक्रिय असावा)
PAN कार्ड (असल्यास नोंदवावे)
नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्राचे नाव योग्य प्रकारे निवडणे अत्यावश्यक आहे, कारण एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर केंद्र बदलता येत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीत घेतलेल्या पिकाचीच विक्री करावी, अन्यथा अर्ज अमान्य ठरू शकतो.
