जालना: रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे हरभरा. मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरभरा पिकाची लागवड केली आहे. शेतातील हरभऱ्याला बाजारात काय दर मिळेल याबाबत शेतकऱ्याच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. आता नवीन हरभरा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दररोज 200 ते 250 क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. या हरभऱ्याला 5500 ते 5850 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. आगामी काळामध्ये हरभरा दराची स्थिती कशी राहील? हे लोकल18 च्या माध्यमातून पाहुयात.
advertisement
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील 8 दिवसांपासून नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. हरभऱ्याला आवक कमी असल्याने चांगला दर मिळत आहे. मात्र आवकेचा दबाव वाढताच हरभऱ्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान 15 दिवसांपूर्वीच कृषी उत्पन्न बाजारपेठेत हरभरा खरेदीचा मुहूर्त झाला. मुहूर्तावर हरभऱ्याला 6 हजार 500 रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. मात्र आवक वाढताच हरभऱ्याचे दर साडेपाच हजार ते 5 हजार 850 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आलेत. आवकेचा दबाव आणखी वाढल्यानंतर हरभऱ्याचे दर 5 हजार ते 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली.
शेतकऱ्याची कमाल, फक्त 30 गुंठ्यातून कमावले 2 लाख! PHOTOS
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुने हरभरे देखील येत आहे. कीड लागलेल्या जुन्या हरभऱ्याला 4 हजार ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. तर कीड न लागलेल्या जुन्या हरभऱ्याला 5000 ते 5500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. सध्या हरभऱ्याचा स्टॉक कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांकडून हरभऱ्याला चांगली मागणी आहे. हरभऱ्याची आवक वाढल्यास आणि प्रक्रिया उद्योगाकडून मागणी तितक्याच प्रमाणात राहिल्यास हरभऱ्याचे दर स्थिर राहू शकतात. मात्र आवकीत मोठ्या प्रमाणात घट झाली आणि प्रक्रिया उद्योगाकडून फारशी मागणी न आल्यास हरभऱ्याचे दर 5 हजार ते 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान राहतील, अशी शक्यता व्यापारी संजय कानडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सध्या बाजार समितीत आवक होत असलेला हरभरा हा कोरडवाहू हरभरा असून बागायती हरभरा बाजारात येण्यास आणखी महिनाभराचा अवधी आहे. महिनाभरानंतर हरभरा पिकाची आवक बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. बाजारात असलेली मागणी आणि आवक यावर हरभऱ्याचे दर अवलंबून राहतील, असे देखील व्यापाऱ्यांनी सांगितलं.





